अकोले : अगस्ती साखर कारखाना पुन्हा बंद होऊ नये असे तालुक्यातील प्रत्येकाला वाटत आहे. कारखाना बंद झाला तर कामगार, ऊस उत्पादक व बाजारपेठ यावर परिणाम होईल. मात्र, अगस्ती बंद पाडायला नेमके कोण निघाले आहे, हे जनतेला कळणे गरजेचे आहे.
अगस्ती साखर कारखाना आर्थिक कडेलोटाच्या उंबरठ्यावर असल्याची बाब शेतकरी नेते दशरथ सावंत, बी. जे. देशमुख हे ऊस उत्पादक यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत. सुरुवातीला या मोहिमेत बरेच शेतकरी होते. त्यातील काही आता कमी झाले.
दुसरीकडे कारखान्यात आर्थिक गैरव्यवहार झाला असेल तर त्याची सहकार खात्याकडून चौकशी होऊन त्यात संचालक मंडळ दोषी आढळल्यास कारवाई होईलच, पण सध्या गळीत हंगाम पूर्वतयारीच्या काळात संस्थेची प्रतिमा मलिन झाल्यास वित्त संस्था कर्ज पुरवठा करण्यास कचरतील. संचालक आपल्या स्वमालमत्तेवर बोजा चढवून कारखान्यासाठी कर्ज घेऊन निधी उभा करतात, ही अगस्तीची परंपरा राज्याच्या सहकार पटलावर आहे. मात्र, डोईवर कर्ज घेऊन देखील संचालक मंडळाची बदनामी होत असेल तर एकत्रित राजीनामा देऊ, असा पवित्रा विद्यमान संचालकांनी घेतला आहे. कारखाना बंद पडू देण्याची त्यांची भूमिका असली तरी बदनामी नको ? असे संचालक बोलताना दिसतात.
तिसरीकडे कामगार संघटनेने सभा घेऊन वेळेप्रसंगी कामगार स्वतःच्या माथी कर्ज घेतील, पण कारखाना बंद पडू देणार नाही, असा नारा दिला. ऊस तोडणी कामगार यांचे करार, यंत्रसामग्रीची मलमपट्टी वेळेत झाली नाही तर गळीत हंगाम सुरू होणार नाही, अशी भीती व्यक्त करत तूर्त आरोप-प्रत्यारोप थांबवावे असे कामगारांना वाटते.
तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी वेट अँड वाॅचच्या भूमिकेत सध्या असले तरी वेळेत ऊस तोडला जावा म्हणून कारखाना बंद पडू नये ही अपेक्षा धरून आहे. कार्यक्षेत्रात जवळपास चार-साडेचार लाख मॅट्रिक टन ऊस गाळपासाठी उभा आहे. कारखान्याची आर्थिक बाजू चव्हाट्यावर आणल्यावर कोणाचे नुकसान होणार? हे प्रश्न असले तरी प्रत्येक सभासदाच्या मनात आर्थिक स्थिती जाणून घेण्याची उत्सुकता लपून राहिलेली नाही.
संचालक मंडळ म्हणते, आर्थिक ठपका आला तर स्व मालमत्ता विकून पैसे भरू. शेतकरी नेते म्हणतात, आम्ही फक्त आर्थिक स्थिती लोकांपुढे मांडतोय, तर कामगारांची गळीत हंगाम सुरू करण्याची धडपड रास्त आहे.
अनेक प्रश्न असून सत्तेच्या राजकीय सारीपटाभोवती हे चक्र अडकून पडले यात शंका नाही.
.................
अगस्तीत सत्ता बदल झाला तेव्हा एक वर्ष कारखाना सुरळीत चालला, दुसऱ्या वर्षी कामगारांनी अध्यक्ष-उपाध्यक्ष यांच्या घरावर मोर्चा काढण्याची भाषा केल्याने त्यांनी राजीनामे दिले. तेव्हा कारखाना बंद पाडल्याचे खापर सुकाणू समितीवर फोडू नये. आर्थिक उधळपट्टीमुळे भविष्यात कारखाना बंद पडू नये म्हणून जनजागृती सुरू आहे. ऊस उत्पादक सभासद झोपेच सोंग घेत असेल तर लढा करायचा कुणासाठी? आर्थिक उधळपट्टीने कारखाना बंद पडल्यास कामगार दोष कुणाला देतील.
- शेतकरी नेते दशरथ सावंत