खर्डा : जामखेड तालुक्यातील खर्डा गावामध्ये मंगळवारी खैरलांजी- खर्डा- मुंबई अँटिकास्ट बाईकर्स मार्च रॅली काढण्यात येऊन सत्यशोधक जनआंदोलन जनसंसद घेण्यात आली. यावेळी दलितांवर होणारे अत्याचार यावर श्वेतपत्रिका मांडत ती पास करण्यात आली. यावेळी ७५ गाड्यांसह १५० युवक-युवती सहभागी झाले. कॉ. नजुभाई गावीत यांच्या अध्यक्षतेखाली जनसंसद पार पडली. यावेळी अनुसूचित जाती जमातींवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करण्यात आला. जागर कलामंचचे शैलेंद्र सोनवणे यांनी निषेधपर गीते व पोवाडे गाऊन जनसंसदेस सुरुवात केली.यावेळी कॉ. गावीत म्हणाले, जातीय व्यवस्था मोडायची असेल तर समाज एक झाला पाहिजे. समाजाच्या अशिक्षिततेचा फायदा घेत धार्मिक-जातीय दंगली भडकवल्या जातात. शिक्षण घ्यावा, अफवांवर विश्वास ठेऊ नका. गोरगरीब दलितांसह स्त्रियांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्या आणि संघटित लढा द्या, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.मणिपूर राज्य फक्त आदिवासी राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. मात्र, तेथील आदिवासींना स्वातंत्र्य नाही. त्यांच्यावर अन्याय सुरू आहे. सिद्धार्थ जगदेव यांनी पोलीस प्रशासन निष्काळजीपणा करीत असल्याची टीका केली. त्यांच्या त्रुटीमुळे गुन्हेगार सुटतात असा आरोप केला. प्रा.प्रकाश सिरसाठ यांचेही भाषण झाले. मयत नितीन आगे याचे वडील राजू आगे यांनी आपली कैफीयत मांडली. तपासात अनेक त्रुटी असल्याचा आरोप केला.कॉ.किशोर जाधव यांनी श्वेतपत्रिका जनसंसदेपुढे मांडून त्याचे वाचन केले.ती बहुमताने पास करण्यात आली.यावेळी संयोजक किशोर जाधव, शैलेंद्र सोनवणे, सिद्धार्थ जगदेव, देवेंद्र इंगळे, दीपक कसाळे आदींसह नागरिक उपस्थित होते. जनसंसद रॅलीचा समारोप दीपक कसाळे यांनी केला. (वार्ताहर)
खर्ड्यात दलित अत्याचार विरोधी श्वेतपत्रिका
By admin | Updated: June 25, 2014 00:29 IST