बोठे याची पोलीस कोठडी संपल्याने शनिवारी त्याला पारनेर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी सरकारी पक्षाच्यावतीने ॲड. मनीषा डुबे पाटील यांनी सांगितले की, बोठे हा फरार असताना त्या काळात त्याने काही लोकांना पत्र पाठविले होते. यातील काही पत्रे पोलिसांनी जप्त केली असून त्या अनुषंगाने पुढील तपास करावयाचा आहे. तसेच बोठे याच्या घरातून एक आयपॅड व मोपेड गाडीही जप्त करण्यात आलेली आहे. रेखा जरे यांची हत्या करण्यासाठी मारेकऱ्यांना दिलेल्या सुपारीची एकूण किती रक्कम होती याबाबतही पोलिसांना पुढील तपास करावयाचा असल्याने आरोपीला आणखी सात दिवसांची पोलीस कोठडी वाढवून मिळावी. सरकारी व आरोपी पक्षाचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने बोठे याला २३ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
...............
बोठेचा पत्रप्रपंच कशासाठी
रेखा जरे यांचे हत्याकांड घडवून आणल्यानंतर बाळ बोठे हा हैदराबाद येथे जाऊन लपला. याकाळात त्याने काही राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या काही जणांना पत्र पाठविल्याचे समजते. या पत्रात मात्र बोठे याने काय लिहिले होते, हे अद्यापपर्यंत समोर आलेले नाही. मात्र, अशी पत्रे पाठवून त्याला काय सिद्ध करायचे होते असा प्रश्न निर्माण झाला आहे.