अहमदनगर : पावसाळ्यात, हिवाळ्यात जमिनीत मोठ्या प्रमाणात तण वाढते. या तणाचा नाश करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी तणावर मिठाची फवारणी करावी. यामुळे चार ते सहा दिवसांत तणाचा नाश होईल, असा सल्ला मीठ शेतीचे अभ्यासक सबाजीराव गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.
सबाजीराव गायकवाड हे गेल्या १६ वर्षांपासून आपल्या शेतातील पिकांवर मिठाचे विविध प्रयोग राबवितात. त्यांनी मिठापासून विविध संशोधन पुढे आणले आहे. त्यांनी आतापर्यंत तीस हजार शेतकऱ्यांनादेखील मीठ शेतीविषयक मोफत मार्गदर्शन केले आहे. ऊस, ज्वारी, बाजरी, कांदा, विविध प्रकारच्या फळझाडांसाठी मिठाचे काय फायदे होतात, याचा सल्लाही शेतकऱ्यांना ते कायम देत असतात.
शेतातील तणाविषयी गायकवाड यांनी सांगितले की, जमिनीत तण वाढल्यानंतर मोकळ्या जमिनीत फवारणीचे प्रमाण १५ लिटर पाणी घेऊन त्यात दोन किलो खडेमीठ विरघळावे. ते मिठाचे पाणी एका स्प्रे पंपात भरावे. ते पाणी तणावर तण भिजेपर्यंत फवारावे. ४ ते ५ दिवसांत तण खाक होऊन जाते. यामुळे खर्चातदेखील बचत होते. मिठाचा केवळ तणांचा नाश करण्यासाठी उपयोग नाही, तर पिकांवर कीटकनाशक म्हणूनदेखील वापर करता येतो. पिकांची पेरणी किंवा कांदा लागवड, फळबाग यातील तणांचा नायनाट करण्यासाठी मिठाचा वापर करावा. मिठाचा प्रमाणशीर व वेळेवर वापर केला, तर कोणतेही पीक रोगाला बळी पडत नाही, असेही त्यांनी सांगितले.
....
क्षारपड जमिनीचा ८.५ पीएच असेल तर मिठाचा वापर करून सहा महिन्यांत जमिनीचा ७ पीएच होतो, हे मी शेतकऱ्यांना सिद्ध करून दाखविले आहे; परंतु हे सर्व करताना कोणत्या पिकाला किती मीठ वापरायचे, कसे वापरायचे, किती वेळा वापरायचे, याचे प्रमाण ठरले आहे. त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांंना कृषी विकास प्रतिष्ठानमार्फत मोफत मार्गदर्शन करतो.
-सबाजी गायकवाड, कृषी अभ्यासक, वाळूंज, ता. अहमदनगर.