अहमदनगर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही जलवाहिनींच्या व मुळा धरण येथील विद्युत वाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी शनिवारी (दि.३) दिवसभर विद्युतपुरवठा खंडित राहणार आहे. त्यामुळे शनिवारी नागापूर व बोल्हेगाव परिसराला पाणीपुरवठा होणार नसल्याचे महापालिकेकडून कळविण्यात आले आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नवीन मुख्य जलवाहिनीला नांदगाव शिवारात पुराणिक वस्तीजवळ गळती लागली आहे. तसेच मुळाधरण येथील पाणी उपसा केंद्रातील विद्युत वाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी शनिवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ यावेळेत विद्युत पुरवठा खंडित केला जाणार आहे. त्यामुळे मुळानगर व विळद येथील पाणीउपसा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे शनिवारी बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड, पाइपलाइनरोड, लक्ष्मीनगर, सूर्यानगर, निर्मलनगर, मुकुंदनगर, स्टेशनरोड, विनायकनगर, केडगाव, नगर-कल्याणरोडवरील शिवाजीनगर आदी परिसराला पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. या भागाला रविवारी पाणीपुरवठा होईल. मध्यवर्ती शहरातील मंगलगेट, रामचंद्र खुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, माळीवाडा, कोठी, गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी, सिव्हिल हडको, प्रेमदान हडको,मनपा कर्मचारी वसाहत,सावेडी, सासरनगर, बुरुडगावरोड परिसराला सोमवारी पाणीपुरवठा होईल. याशिवाय सर्जेपुरा, तोफखाना सिद्धार्थनगर, लालटाकी, दिल्लीगेट, नालेगाव, चितळेरोड, ख्रिस्त गल्ली, माळीवाडा, बालिकाश्रम रोड, सारसनगर, बुरुडगाव परिसराला मंगळवारी पाणीपुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.