करंजी : पाथर्डी तालुक्याच्या सतत दुष्काळी असणाऱ्या पश्चिम भागाला वरदान ठरणाऱ्या वांबोरी चारी टप्पा दोनच्या कामासाठी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच मुंबईत बैठक होणार असल्याची माहिती सातवडचे सरपंच राजेंद्र पाठक यांनी दिली.गर्भगिरी डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या गावांना शेतीसाठी पाणी तर सोडाच पण पिण्याच्या पाण्याची कायम टंचाई असते. वांबोरी चारी टप्पा दोनला लवकरच निधी उपलब्ध होऊन कामास सुरुवात होणार असल्याच्या वृत्ताने या भागातील शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. मुळा धरणातून लोखंडी पाईपच्या सहाय्याने डोंगराच्या बाजूने या भागातील कोल्हार, शिराळ, चिचोंडी, डोंगरवाडी, लोहसर, भोसे, वैजू बाभूळगाव, दगडवाडी, करंजी गावासह अनेक गावांचे डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या पाझर तलावात पाणी सोडण्यात येणार आहे. ही योजना या भागाला वरदान ठरणार असून मंत्री तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली या भागातील कार्यकर्त्यांचे एक शिष्टमंडळ जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेणार आहेत. गेल्या २ वर्षांपासून वांबोरी चारीला नियमित पाणी येत असल्याने या भागातील पाणी टंचाई कमी झाली असल्याचेही पाठक यांनी सांगितले.
या योजनेत समावेश असलेल्या टेलच्या करंजीच्या तलावापासून अवघ्या काही मीटर अंतरावर असलेल्या खंडोबावाडी तलावाचा या योजनेत समावेश करावा, अशी मागणी प्रा. अमोल आगासे, बाळासाहेब भिटे, अशोक गरगडे, अर्जुन भिटे, रवींद्र नगरे, ऋषी भिटे, जीवन आगासे, महादेव नजन आदींसह ग्रामस्थांनी केली आहे.
---
वांबोरी चारीत असलेल्या त्रुटीमुळे वांबोरी चारी पूर्ण क्षमतेने चालत नाही. या योजनेतील त्रुटी टाळून वांबोरी चारी टप्पा दोनचे काम झाल्यास ही योजना या भागाला वरदान ठरेल.
-अरुण आठरे,
अध्यक्ष, वांबोरी चारी कृती समिती
---
वांबोरी चारी टप्पा दोन योजनेचे पाईप जमिनीवरून घेतल्यास पाणी चोरी टळेल. योजना सौर ऊर्जेवर चालविल्यास तिला काहीही अडचण येणार नाही.
-बाळासाहेब अकोलकर,
सरपंच, करंजी