तिसगाव : शेतकी विभागाकडे नोंदणी झालेल्या ऊस क्षेत्राच्या माध्यमातून गळितास आठ लाख मेट्रिक टन ऊस मिळू शकेल. शासकीय निकष, पर्जन्यमान व उसाची तत्कालीन उपलब्धता पाहून ऑक्टोबरपासून वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करण्याचा मानस आहे, असे प्रतिपादन अध्यक्ष आप्पासाहेब राजळे यांनी केले.
वृद्धेश्वर कारखान्याच्या मिल रोलरचे बुधवारी पूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष रामकिसन काकडे, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, ज्येष्ठ संचालक उद्धवराव वाघ, सुभाषराव ताठे, कुशीनाथ बर्डे, सुभाषराव बुधवंत, शरदराव अकोलकर, महादेव जायभाय, अनिल फलके, श्रीकांत मिसाळ आदी उपस्थित होते.
कारखाना अंतर्गत विविध मशीनरींची देखभाल दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत. ऊस वाहतुकीची वाहने यंत्राने गव्हाणीत खाली होण्यासाठी ट्रिपलर सुविधा गत हंगामापासूनच सुरू केली आहे. उत्पादित साखर पोत्यांमध्ये भरण्यासाठीची सायलो सिस्टिम सुविधेचे काम अंतिम टप्प्यात आहे. कारखान्यात विविध ठिकाणी स्वयंचलित यंत्रणा बसविण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न सुरू आहे, असे सांगून राजळे म्हणाले, अप्पर जिल्हाधिकारी संदीप निचित यांच्या अध्यक्षतेखाली प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांनी इथेनॉल प्रकल्पाची अंतिम जनसुनावणी नुकतीच घेतली. त्यामुळे प्रकल्प उभारणीच्या प्रत्यक्ष कामाला आता गती येईल.
प्रास्ताविक कार्यकारी संचालक जालिंदर पवार यांनी केले. सरव्यवस्थापक भास्करराव गोरे यांनी आभार मानले. प्रशासकीय अधिकारी विनायक म्हस्के, रवींद्र महाजन, लेखापाल संभाजी राजळे, चीफ केमिस्ट किशोर आठरे, अभियंता एन.डी. नलगे बाळासाहेब मरकड आदी उपस्थित होते.