अहमदनगर : महापालिकेच्या प्रभाग तीनच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. १७ एप्रिलला मतदान होणार असून २२ मार्चपासून उमेदवारी अर्ज स्वीकृतीस सुरुवात होणार आहे. प्रभागाचे नगरसेवक विजय भांगरे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक होत आहे. भांगरे हे सेनेकडून २०१३ च्या सार्वत्रिक पोटनिवडणुकीत विजयी झाले होते. जूनमध्ये महापौरपदाची निवडणूक होणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुकीला विशेष महत्व आहे. सेनेला ही जागा कायम राखण्याचे आव्हान आहे तर जागा सेनेच्या ताब्यातून मिळविण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. सेनेकडून भांगरे यांच्याच कुटुंबातील उमेदवार देण्यात येणार असून भावनिक आवाहन करून पोटनिवडणूक बिनविरोधासाठी प्रयत्न सुरू असल्याचे समजते. महापौरपदाच्या निवडणुकीसाठी बलाबलाचा आकडा पार करण्याकरीता या जागेवरून युती-आघाडीत रस्सीखेच होणार आहे. राष्ट्रवादीने अजूनही आपली भूमिका जाहीर केलेली नाही. २२ मार्च ते २९ मार्च या काळात उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. ३० मार्चला उमेदवारी अर्जांची छाननी तर १ एप्रिलपर्यंत माघारीची मुदत आहे. २ एप्रिल रोजी चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. १७ एप्रिल रोजी मतदान तर १८ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. (प्रतिनिधी)
पोटनिवडणुकीसाठी १७ एप्रिलला मतदान
By admin | Updated: March 13, 2016 14:13 IST