कोपरगाव : नाशिक धरण समूहातील दारणा, गंगापूर धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. ओव्हरफ्लोचे पाणी गोदावरी नदीला सोडले जात आहे, तेव्हा कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील गोदावरी कालवा लाभक्षेत्रातील गावतळी, दगडी साठवण बंधारे या पाण्याने भरून द्यावेत, अशी मागणी भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.
कोल्हे यांनी नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व उत्तर महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता तसेच अहमदनगरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठविले आहे. या निवेदनात म्हटले आहे, गोदावरी डाव्या आणि उजव्या कालवा लाभक्षेत्रात चालूवर्षी पाऊस उशिरा पडत आहे. अजूनही भूगर्भातील पाण्याची पातळी वाढलेली नाही, तेव्हा ओव्हरफ्लोच्या पाण्याने गावतळे, साठवण बंधारे, दगडी साठवण बंधारे भरून द्यावे, अशी असंख्य शेतकऱ्यांनी आपल्याकडे मागणी केली आहे. भूगर्भातील पाणी वाढले तर त्याचा फायदा जनावरांसह नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहे, असे कोल्हे यांनी निवेदनात म्हटले आहे.