केडगाव : नगर तालुक्यातील इमामपूर येथील जंगलाला वणवा लागला असून शेकडो हेक्टर क्षेत्र जळून खाक झाले आहे. वणव्यात विविध झाडांचे तसेच पशुपक्ष्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
राहुरी तालुक्यातील गुंजाळे हद्दीतील डोंगरात वणवा लागल्यानंतर त्याची झळ इमामपूर हद्दीतील डोंगरालाही लागली. राहुरी तालुक्यातील व नगर तालुक्यातील शेकडो हेक्टर क्षेत्र त्यामध्ये जळून खाक झाले आहे.
इमामपूर येथील सर्व्हे नंबर ८४३ तसेच सर्व्हे नंबर ८५० मधील कवड्या डोंगरावर वणवा पेटल्याने मोठ्या प्रमाणात जंगलातील विविध जातींच्या वनस्पती जळून खाक झाल्या आहेत. वनविभागाने योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
जेऊरचे वनपाल मनीष जाधव, वनरक्षक श्रीराम जगताप, वनकर्मचारी संजय सरोदे, बाळू दाणी, संजय पालवे, दगडू भांड, गुंडेगाव वनपाल जाधव, कवडगाव वनपाल कानिफनाथ साबळे, राहुरी येथील वनकर्मचारी तसेच इमामपूर येथील ग्रामस्थांनी वणवा विझवण्यासाठी प्रयत्न केला.
फोटो : ०५ इमामपूर आग
इमामपूर येथे वनक्षेत्राला लागलेली आग.