अहमदनगर : दोन दिवसांच्या खंडानंतर व कोविन ॲपमधील तांत्रिक बिघाड दूर झाल्यानंतर कोरोना लसीकरण मोहीम पुन्हा सुरू झाली. लसीकरणाच्या तिसऱ्या दिवशी, बुधवारी दिवसभरात ६९६ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस टोचून घेतली. पहिल्या दिवशी ८७१ कर्मचाऱ्यांना लस दिली होती. एका दिवशी बाराशे कर्मचाऱ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट असताना बुधवारी ते ५० टक्केच पूर्ण झाले.
जिल्ह्यात लसीकरणाला शनिवारी (दि. १६) सुरुवात झाली होती. पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील १२ केंद्रांवर ८७१ जणांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर दोन दिवसांच्या सुटीनंतर मंगळवार आणि बुधवारी पुन्हा लसीकरणाची मोहीम राबविण्यात आली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जात आहे. २१ पैकी सध्या १२ केंद्रांवर लस दिली जात असून, दर दिवशी एका केंद्रावर १०० कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. त्यानुसार बुधवारी १२०० कर्मचाऱ्यांनी लस घेणे आवश्यक होते. मात्र दिवसाचे निम्मेच उद्दिष्ट पार पडले.
पोर्टलवर नोंद असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येत आहे. लस पूर्णपणे सुरक्षित असून लसीकरणामुळे कोणाला तीव्र त्रास झाला नसल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली आहे. कोणतीही लस अथवा इंजेक्शन दिल्यानंतर हात दुखणे, किंचित ताप येणे अथवा मळमळणे, आदी सामान्य लक्षणे जाणवतात. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. संदीप सांगळे, महानगरपालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी लसीकरण मोहिमेचे नियोजन केले आहे.
------
असे झाले लसीकरण
पहिल्या दिवशी ८७१, दुसऱ्या दिवशी ६५०, तिसऱ्या दिवशी ६९६ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. तिसऱ्या दिवशी ६९६ कर्मचाऱ्यांना लस दिली, त्यामध्ये जिल्हा रुग्णालय येथे ७७, उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी - ३५, उपजिल्हा रुग्णालय कर्जत - ९, शेवगाव ग्रामीण रुग्णालय - ६७, श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालय- ५२, रहाता ग्रामीण रुग्णालय -५२, संगमनेर ग्रामीण रुग्णालय - ७१, अकोले ग्रामीण रुग्णालय - १०४ तसेच महानगरपालिका क्षेत्रातील तोफखाना नागरी आरोग्य केंद्र - ३०, जिजामाता नागरी आरोग्य केंद्र - ८५, केडगाव नागरी आरोग्य केंद्र - २६ आणि नागपूर नागरी आरोग्य केंद्र येथे ८८ जणांचे लसीकरण करण्यात आले होते.