कोपरगाव : कोपरगाव इमारत बांधकाम कामगारांना त्वरित मोफत कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण करावे. तसेच तालुकानिहाय इमारत बांधकाम कामगार सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटल उभारावे, अशी मागणी कोपरगाव इमारत बांधकाम संघटनेचे अध्यक्ष किशोर चोरगे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
चोरगे म्हणाले, शासनाला अनेकदा निवेदन दिले. मात्र, शासन निवेदनाची दखल गांर्भीयाने घेत नाही ही चिंताजनक बाब आहे; पण या निवेदनाची दखल घेत कोरोना काळात तिसरी लाट येण्याअगोदर सर्व इमारत बांधकाम कामगारांना लसीकरण करावे. देशासह राज्याच्या अर्थकारणाला इमारत बांधकाम कामगार हातभार लावतो; परंतु तरीही तो उपेक्षित आहे. शासनाकडे कामगारांच्या हक्काचा अनेक कोटींचा निधी पडून आहे. तो उपयोगात आणून त्या निधीतून इमारत बांधकाम कामगारांना त्वरित मोफत लसीकरण करावे. निवेदनावर कृष्णा आघाडे, महेश मवाळ, संतोष लांडगे, दिलीप घुमरे, कृष्णा ढोक, विशाल अभंग, दाऊद पठाण यांच्या सह्या आहेत.