नेवासा : शहरात विनामास्क नागरिकांसह व्यापाऱ्यांवर मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांच्या नेतृत्वाखालील नगरपंचायतच्या पथकाने दंडात्मक कारवाई केली.
कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करणाऱ्यांवर कारवाईसाठी कार्यालयीन अधिकारी रवींद्र गुप्ता, विश्वास वाघमारे, प्रताप कडपे, कार्यालयीन कर्मचारी मनीषा मापारी, अनिता सोनवणे आदींचे पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाने शहरात कारवाई केली. शहरात बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिकांसह व्यवसाय करणाऱ्या काही व्यापाऱ्यांच्या तोंडाला मास्क नसतो हे निदर्शनास आले होते. त्यामुळे नगरपंचायतच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास शहरातील मुख्य बाजारपेठेसह संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर रस्ता, नगरपंचायत चौक, बाजारतळ परिसर, एस. टी. स्टँड परिसर, श्रीरामपूर रस्ता येथे मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर तसेच दुकानातील काही व्यापाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई केली.
---
पथक दरराेज फिरणार..
नेवासा शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी खरेदीसाठी येणाऱ्या बाहेरील लोकांची संख्या अधिक आहे. त्यात मास्क न वापरणारे अनेक असतात. त्यामुळे पथकाडून दररोज दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी मास्क लावूनच घराबाहेर पडावे. शासन नियमांचे पालन करावे, असे आवाहन मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी केले आहे.