पारनेर : शहरातील कान्हुरपठार रस्त्यावरील पाटाडीमळा, संगमेश्वर मंदिर, आय़टी़आय़, बांधकाम विभाग या परिसरात शुक्रवारी सायंकाळी दोन बिबट्यांचा पारनेरकरांनी चार तास थरार अनुभवला़ वनविभागाचे पथक येईपर्यंत बिबट्याने धूम ठोकली. या परिसरातील नागरिकात घबराटीचे वातावरण आहे़ पारनेर शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून आय़टी़आय़, सोबलेवाडी तलावासह परिसरांत बिबट्याचे वास्तव्य आहे़ वन विभागाने या परिसरांत पिंजरे लावले आहेत. पण त्याच्याजवळ बिबटे येऊन निवांतपणे बसत असल्याचे चित्र दिसून येत आहे़ शुक्रवारी सांयकाळी साडेसातच्या सुमारास पाटाडीमळा परिसरात दोन बिबटे असल्याची माहिती तेथील रहिवाशांनी भाजपाचे शहराध्यक्ष भिमाजी औटी यांना दिली़ त्यानंतर औटी यांनी नागेश्वर मित्र मंडळाचे कल्याण थोरात, समीर शेख, गणेश कावरे,अनिकेत रमेश औटी, वैभव बडवे, सचिन बडवे, दत्ता शेरकर, रमेश औटी, धिरज महांडुळे, डॉ़नरेद्र मुळे, पक्षीमित्र रावसाहेब कासार, संदीप खेडेकर सर्वजण पाटाडी मळयात दाखल झाले़ त्यांनंतर या युवकांनी संगमेश्वर मंदिराच्या रस्त्यावर गेल्यावर एक बिबट्या रस्त्याजवळच असल्याचे दिसून आले़ युवकांना पाहिल्यावर बिबट्या एका बंदिस्त घराजवळ जाऊन बसला़ तो बिबट्या पहात असतानाच दुस-या बाजूला आय़टी़आय़ व बांधकाम विभागाच्या भिंतीवर दुसरा बिबट्या दिसल्याने युवकांची तारांबळ झाली़़ वाहनातून खाली उतरलेल्या युवकांकडे धाव घेण्याचा बिबट्याने प्रयत्न केला, पण इतर युवकांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने आय़टी़आयक़डे धूम ठोकली़ नंतर तो पुन्हा बांधकाम विभागाच्या भिंतीवर जाऊन बसला़ यावेळी बिबट्याने अर्धातास दर्शन दिले. तासाभराने वन विभागाचे कर्मचारी आले. पण त्यांच्या हाती काहीच लागले नाही. तोपर्यंत बिबट्या संगमेश्वर मंदिराकडे धूम ठोकली.पारनेर वन विभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी अनंत कोकाटे यांना माहिती दिल्यावर त्यांनी वन विभागाच्या वनअधिकारी व आणखी अशा दोन महिलांसह कर्मचा-यांना पाठवून दिले़ स्वत: मात्र तिकडे फिरकले सुध्दा नाहीत.त्यांना कॅमेरे कोठे लावले आहेत असे विचारल्यावर कॅमेरे आजच काढले असून जुन्नर विभागाने कॅमेरे नेल्याचे सांगीतले़ दरम्यान बांधकाम विभागाजवळ वनविभागाने लावलेल्या पिंज-यात भक्षच ठेवले नसल्याचे दिसून आले़
पारनेर शहरात दोन बिबट्याचा चार तास थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 18:37 IST