बोधेगाव : शेवगाव-गेवराई मार्गावरील बोधेगाव येथील पूर्णपणे उखडलेल्या काळा ओढ्यावरच्या पुलावर रविवारी (दि.२८) दुपारी तीनच्या सुमारास ऊस वाहणाऱ्या डबल ट्राॅली ट्रॅक्टरची पूढची एक ट्राॅली उलटली. याठिकाणी अपघात नित्याचे बनले आहेत. सुदैवाने नजीकच्या एका हाॅटेलच्या नुकसानीसह जीवितहानी टळली.
बोधेगाव येथील काळा ओढ्यावरच्या उखडलेल्या पुलाची दयनीय अवस्था मागील चार महिन्यांपासून ‘जैसे थे’ आहे. या ठिकाणी खड्ड्यांमुळे वाहने आदळून अपघातांसह वाहतूक कोंडीचे दृश्य नित्याचे बनले आहे. सध्या कारखान्याचे गळीत हंगाम सुरू असल्याने ऊस वाहतूक करणाऱ्या टायर बैलगाडी व इतर वाहनांसाठी हा पूल मृत्यूचा सापळा बनत आहे.
रविवारी दुपारी केदारेश्वर साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या डबल ट्राली ट्रॅक्टरची भरलेली पुढील एक ट्राॅली पूल चढताना रिव्हर्स येत जागीच उलटली. शेवगाव-गेवराई मार्गावर कायम वर्दळ असते. सुदैवाने त्यावेळी ट्रॅक्टरला इतर वाहने तेथून ओलांडून पुढे निघत नव्हते. अन्यथा त्याखाली सापडून मोठी दुर्घटना घडली असती. तसेच नजीकच्या एका हाॅटेलचेही थोड्या अंतरावरून नुकसान टळले. येथील पुलावर कायम अपघात होत आहेत. परंतु, संबंधित प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.
----
२८ बोधेगाव
शेवगाव-गेवराई मार्गावरील बोधेगाव येथील काळा ओढ्यावरच्या पुलावर उलटलेली उसाची ट्राॅली.