राहुरी : राज्यातील आदिवासी समाजातील नागरिकांसाठी राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना असून, या योजनांचा लाभ तळागाळातील आदिवासी नागरिकांना मिळावा यासाठी अधिक प्रयत्न केले जातील, असे मत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केले. शनिवारी (दि. ४) राहुरी तालुक्यातील तांभेरे येथे आदिवासी समाजातील नागरिकांना जात प्रमाणपत्राचे वितरण मंत्री तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सरपंच नितीन गागरे, उपसरपंच सागर मुसमाडे, किशोर गागरे, सुधाकर मुसमाडे, उमेश मुसमाडे, सुनील शेलार, गणेश शेलार, नितीन गागरे, ज्ञानदेव बेलकर, मच्छिंद्र बेलकर, एल. पी. गागरे, दादासाहेब पवार, विनोद मुसमाडे व आदिवासी समाजातील लाभधारक उपस्थित होते.
तनपुरे म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी समाज शासकीय योजनांपासून दूर होता. शासनाने या वंचित घटकांसाठी विविध उपाय योजना जाहीर केलेेल्या आहेत. परंतु, अनेक आदिवासी नागरिकांकडे जात प्रमाणपत्र नसल्याने शासकीय योजनांचा लाभ घेता येत नव्हता. ही गरज ओळखून या समाजातील नागरिकांना एकत्र करत प्रबोधन केले. कागदपत्रांची जुळवाजुळव करून प्रत्यक्षात लाभ कसा देता येईल, यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. अखेर त्याला बऱ्याच कालावधीनंतर यश मिळाले आणि आज प्रत्यक्षात जात प्रमाणपत्र वितरण करताना मानसिक समाधान मिळत आहे. प्रमाणपत्र मिळाल्याने विविध शासकीय योजनांचा लाभ लाभधारकांना घेता येईल. वंचित असलेल्या आदिवासींना मूळ प्रवाहात आणणे गरजेचे आहे.