नेवासा फाटा : अहमदनगर-औरंगाबाद मार्गावर नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला शिवारात ट्रकचालकास लुटण्याचा प्रकार शनिवारी (दि.२०) मध्यरात्री एकच्या सुमारास घडला. हा ट्रक औरंगाबादकडे चालला होता.
याबाबत ट्रकचालक शहाबुद्दीन गुलामवारीस मोहम्मद (वय २१, रा. गौरीगंज, उत्तर प्रदेश) यांनी नेवासा पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली. शहाबुद्दीन मोहम्मद हा शुक्रवारी (दि.१९) दुपारी साडेतीन वाजता मुंबई येथून ट्रकमध्ये फळे घेऊन रांची (झारखंड) येथे चालला होता. शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास त्यांचा ट्रकनगर-औरंगाबाद रस्त्यावरून औरंगाबादकडे चालला होता. उस्थळ दुमाला शिवारात (ता. नेवासा) एस्सार पेट्रोलपंपाच्या पुढे काही अंतरावर एका दुचाकीवर बसलेल्या तिघांनी ट्रकला दुचाकी आडवी लावली. त्यामुळे चालकाने ट्रक थांबविली. दुचाकीवरील तिघांनी खाली उतरून ट्रकच्या काचेवर दगड मारले. ट्रकच्या कॅबीनमध्ये चढून चालकाला मारहाण केली. खिशातील साडेबारा हजार रुपये काढून घेतले, असे फिर्यादीत म्हटले आहे.