केडगाव : शासनाने यावर्षी ई-पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून पीकपेरा नोंदविण्याचा कार्यक्रम हाती घेतला. मात्र, ही प्रक्रिया किचकट ठरत असून, शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी वाढविणारी आहे. ई-पीक पाहणीत विविध स्वरूपातील अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्या तत्काळ दूर कराव्यात, अशी मागणी गुंडेगाव (ता. नगर) येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांकडे आजही ॲण्ड्रॉइड मोबाइल नाहीत. ग्रामीण भागात पुरेशा गतीने मोबाइल नेटवर्क मिळत नाही. बहुतांश शेतकऱ्यांना मोबाइल हाताळताही येत नाही. त्यामुळे ई-पीक पाहणी प्रक्रियेचा बोजवारा उडवायचा नसेल, तर शासनाने प्रत्येक गावाची जबाबदारी त्या-त्या गावच्या कृषी सहायकावर निश्चित करायला हवी. शासनाने सर्व जबाबदारी शेतकऱ्यांवर टाकल्याने त्रुटी राहण्याची शक्यता अधिक आहे. त्याचा त्रास शेतकऱ्यांनाच सहन करावा लागणार आहे. त्यामुळे महसूल व कृषी विभागाने शेतकऱ्यांना जाणवणाऱ्या समस्या त्वरित निकाली काढाव्यात, तसेच तलाठी व कृषी सहायकांवर जबाबदारी निश्चित करावी, आशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक भापकर गुरुजी यांनी केली आहे.
---
गुंडेगाव येथील धावडेवाडी येथे कोणत्याही मोबाइल कंपनीचे नेटवर्क नाही. आम्ही ई-पीक पाहणी कशी करावी, हा प्रश्न निर्माण आहे. शासनाने पर्यायी व्यवस्था द्यावी.
-मारुती सयाजी धावडे,
शेतकरी, गुंडेगाव
----
गावातील अनेक शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी ॲप हाताळता येत नाही. नोंदणी करताना खूप अडचणी निर्माण होतात. त्यामुळे गुंडेगाव येथील अनेक शेतकरी ई-पीक पाहणी नोंदणीपासून वंचित आहेत.
-संतोष भापकर,
उपसंरपच, गुंडेगाव