चंद्रकांत शेळके, अहमदनगर एसटी महामंडळाच्या बसला यापुढे राज्यात कुठेही टोल भरावा लागणार नाही, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केल्यानंतर राज्यभरातील आगारांत उत्साहाचे वातावरण पसरले. या निर्णयामुळे राज्यभरात एसटी महामंडळाचा सुमारे १०० कोटींहून अधिक टोल वाचणार असल्याने एसटीला मोठा दिलासा मिळेल. ‘कायम तोट्यात’ अशी कायमचीच बोंब असणाऱ्या एसटीला निदान या निर्णयामुळे काही दिवस तरी आनंदाचे ठरतील. दरवर्षी एसटी राज्यभरातील सर्व टोलनाक्यांवर सरासरी १०० ते १२५ कोटींची रक्कम भरते. त्यामुळे आधीच तोट्यात असलेल्या एसटीला हा अतिरिक्त भार पडत होता. परंतु शासनाने राज्यभरातील १६६ पैकी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अशा एकूण १२६ टोलनाक्यांवर एसटीला टोलमुक्तीची घोषणा केल्याने एसटीच्या नफ्यात भर पडणार आहे. केंद्रीय प्राधिकरणाच्या राज्यात असणाऱ्या ४० टोलनाक्यांबाबत अजून निर्णय झालेला नाही. परंतु तेथेही एसटीला टोलमाफी मिळण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे पाठपुरावा करणार आहे. मागील वर्षी टोलपोटी एसटी महामंडळाला १३२ कोटी रूपये खर्च करावे लागले होते. राज्यमार्गाच्या तुलनेत राष्ट्रीय महामार्गांवरून एसटीची वाहतूक कमी असल्याने आता टोल भरण्याची रक्कम खूपच कमी असणार आहे. त्यामुळे एसटीला वार्षिक सरासरी १०० कोटींचा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
१०० कोटींचा अंदाजराज्य सरकारने एसटीला संपूर्ण टोलमाफी केल्याची घोषणा केली आहे; परंतु अधिकृत माहिती अजून महामंडळाला मिळालेली नाही. संपूर्ण टोलमाफी आहे की फक्त ४४ नाक्यांवरच याची माहितीही आमची यंत्रणा घेत आहे. मागील वर्षी टोलपोटी एसटीने १३२ कोटी रूपये भरले होते. राष्ट्रीय महामार्ग वगळता राज्यमार्गावर जरी टोलमाफी मिळाली तरी साधारण १०० कोटींचा फायदा होऊ शकतो. - जीवन गोरे, अध्यक्ष, एसटी महामंडळ
नगरचे वाचणार सव्वाचार कोटीनगर जिल्ह्यात असलेल्या टोलनाक्यांपोटी नगर विभागीय कार्यालयाला दरमहा ३५ ते ४० लाखांची रक्कम भरावी लागते; परंतु टोलमाफीच्या या निर्णयामुळे नगर विभागाचे आता वार्षिक सरासरी सव्वाचार कोटी वाचणार आहेत. टोलमाफीच्या निर्णयामुळे भविष्यात आता बराच काळ भाववाढीपासून प्रवाशांनाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे.