लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : परदेशामधील शेतीतील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या अभ्यास दौऱ्यासाठी जिल्ह्यातील २९० शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे अर्ज केले आहेत. दौ-यासाठी या अर्जामधून लॉटरी पध्दतीने अंतिम निवड केली जाणार आहे. शेतीचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी परदेश दौऱ्याचे आयोजन करण्यात येते.
कृषी विभागाकडून परदेशातील शेतीच्या अभ्यास दौऱ्यासाठी जाण्यास इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले होते. अर्ज दाखल करण्यासाठी शासनाने मुदत ठरवून दिली होती. या मुदतीमध्ये जिल्ह्यामधून २९० शेतकऱ्यांनी कृषि विभागाकडे अर्ज केले आहेत. मात्र या अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. या छाननीनंतरची अर्जाची यादी कृषी सहसंचालकांकडे पाठविली जाणार आहे. त्यानंतर ही यादी राज्य सरकारकडे पाठविली जाणार आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांची अंतिम निवड लॉटरी पध्दतीने केली जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया १० ऑक्टोबरपर्यत पुर्ण होण्याची शक्यता आहे. लॉटरीनंतर निवड झालेल्या शेतकऱ्यांची नावे जाहीर केली जाणार आहेत. या दौऱ्यासाठी सरकारने खासगी प्रवासी वाहतूक कंपन्यांची नियुक्ती केली आहे. शेतकऱ्यांसोबत जाण्यासाठी कृषी विभागाने अधिकारी नियुक्त केले आहेत. प्रगत देशातील शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा शेतकरी अभ्यास करणार आहेत.
या देशात जाण्याची संधी
दौऱ्यात शेतकऱ्यांना जर्मनी, नेदरलँड, इस्राईल आणि ऑस्ट्रेलिया या देशातील शेतीचा अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे. ऑस्ट्रेलियासाठी १ लाख रुपये, इस्राईलसाठी ५१ हजार , जर्मनीसाठी ६३ हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.