उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील वसंत कान्हू फुलमाळी (रा. शंकरनगर, पाथर्डी), संदीप वसंत चव्हाण (रा. पोलीस वसाहत, शेवगाव ) व कैलास नारायण पवार (रा. शंकरनगर, पाथर्डी) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून गुन्हा दाखल होताच तिघे पोलीस कर्मचारी पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. पाथर्डी तालुक्यातील २७ वर्षीय तक्रारदाराचा वाळूचा ट्रक उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांच्या पथकाने ७ एप्रिल रोजी पकडला होता. दरम्यान, या ट्रकवर कारवाई न करता सोडून देण्याच्या मोबदल्यात व वाळू वाहतुकीसाठी ट्रक चालू देण्यासाठी हप्ता म्हणून कर्मचाऱ्यांनी पंधरा हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. पथकाने आयोजित लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान वरील नमूद तिन्ही लोकसेवक यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती १५ हजार लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर तिघा पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्याम पावरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
........
या प्रकरणाची रंगली होती चर्चा
लाच प्रकरणी गुन्हा दाखल होण्याअगोदर या प्रकरणाची माहिती तालुकाभर पसरून तिघा पोलिसांच्या कारनाम्याची चर्चा चांगलीच रंगली होती. पोलीस दलाची प्रतिमा मलिन होत असल्याचे लक्षात येताच या प्रकरणाशी निगडित एका पोलीस कर्मचाऱ्याची तडकाफडकी नगर येथे बदली करण्यात आली. अन्य दोघांच्याही बदलीची चर्चा रंगली होती. त्यांच्यावर काय कारवाई होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. या प्रकरणी सोमवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या तिघांचा गॉडफादर कोण? त्याच्यावर वरिष्ठांकडून काय कारवाई करणार? अशी चर्चा सध्या तालुक्यात रंगली आहे.