जामखेड : दरोडा, आर्म ॲक्टसह विविध गुन्ह्यांमध्ये फरार असणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना मंगळवारी (९ मार्च) अटक करण्यात जामखेड पोलिसांना यश आले आहे. हे आरोपी चार वर्षांपासून फरार होते.
चार वर्षांपासून फरार असलेले प्रदीप राजू कांबळे, बाळू सीताराम मिसाळ व विशाल जगन्नाथ जाधव हे सोनेगाव (ता. जामखेड) येथे त्यांच्या गावी आले असल्याची खबर पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र थोरात, पोलीस काॅन्स्टेबल संग्राम जाधव, आबासाहेब आवारे, अरूण पवार, विजय कोळी, संदीप राऊत, अविनाश ढेरे, गणेश गाडे या कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले एक पथक आरोपी पकडण्यासाठी रवाना केले.
या पथकाने सापळा रचत दिनांक ९ मार्च रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास तीनही आरोपींना अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र थोरात, सचिन देवढे हे करीत आहेत.