लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पूनावाला यांना धमक्या येत असल्याने, त्यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा पुरवली आहे, तसेच पुनावाला यांना ज्या क्रमांकावरून धमक्या आल्या आहेत, त्यांची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिला.
देसाई यांनी रविवारी नगर येथे पोलीस अधीक्षक कार्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. देसाई म्हणाले, अदर पुनावाला हे चांगले काम करत असून, त्यांना येत असलेल्या धमक्यांबाबत योग्य ती चौकशी केली जाईल. राज्यभरामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने, दुसऱ्या टप्प्यात कडक लॉकडाऊन करून त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय आहे. मी नुकतेच विविध जिल्ह्यांत जाऊन बैठका घेतल्या आहेत. तेथेही कडक अंमलबजावणीच्या सूचना दिल्या आहेत.
कर्तव्य निभावत असताना पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत आहे. अशा वेळी पोलीस दलाच्या पॅनेलवर असलेल्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. आता या रुग्णालयांमध्ये पोलिसांसाठी राखीव बेड ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलिसांसाठी दहा टक्के इंजेक्शन-बेड व अन्य आरोग्य सुविधा राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. त्या संदर्भात आता यात त्यांच्या नातेवाइकांचाही समावेश करता येईल का, या संदर्भात आरोग्यमंत्री यांच्याशी तत्काळ चर्चा करून सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगत देसाई म्हणाले, कोरोनाच्या प्रादुर्भावात नगर पोलीस उत्कृष्ट काम करत आहे. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल उपस्थित होते.
.........
जप्त इंजेक्शनबाबत जिल्हाधिकारी निर्णय घेतील
राज्यभरामध्ये पोलीस व आरोग्य विभागाने संयुक्तपणे कारवाई करून काही ठिकाणी रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा हस्तगत केलेला आहे. जप्त केलेले इंजेक्शन हे स्थानिक पातळीवर पुन्हा रुग्णांना वाटण्याच्या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी हे निर्णय घेतील, असे देसाई यांनी सांगितले.
.........
पोलीस भरती होणार
राज्यात पोलीस भरती करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रथम आरोग्य सुविधांना प्राधान्य दिले. त्यामुळे भरतीप्रक्रिया काही काळ स्थगित करावी लागली होती. आता मात्र कॅबिनेटने नवीन भरती प्रक्रियेला मंजुरी दिली असून, पोलिसांची भरती प्रक्रिया सध्या सुरू असल्याचे मंत्री देसाई यांनी यावेळी सांगितले.