पाथर्डी : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नुकतीच ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांची भेट घेतली. ढाकणे कुटुंबीयांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी ढाकणे यांनी ‘तुझे काम चांगले असून तुला शरदरावासारखे भवितव्य आहे’, असे सांगत पाठीवर कौतुकाची थाप टाकीत पवार व ढाकणे कुटुंबीयांच्या तिसऱ्या पिढीने जनहितासाठी संघर्ष करावा, असा सल्ला त्यांनी रोहित पवार यांना दिला.
मागील आठवड्यात आमदार रोहित पवार यांनी प्रताप ढाकणे यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त पाथर्डी दौरा केला. कार्यक्रमानंतर पवार यांनी ज्येष्ठ नेते बबनराव ढाकणे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. तसेच मराठा व ओबीसी आरक्षणावर चर्चा करीत त्यांचे मार्गदर्शन घेतले. ढाकणे यांनी केदारेश्वर साखर कारखान्याच्या भूमिपूजनाला तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांच्यासमवेत तत्कालीन संरक्षणमंत्री शरद पवार उपस्थित होते. तसेच कारखान्याच्या पहिल्या गाळप हंगामाची पहिली उसाची मोळी आपले आजोबा अप्पासाहेब पवार यांच्या हस्ते टाकण्यात आली होती. याची आठवण करून देत कारखान्यासंदर्भात कोणतीही अडचण असली तरी प्रत्येक वेळी पवार कुटुंबाने सहकार्य केल्याचे सांगितले.
रोहित पवार यांनीही ढाकणेंच्या तब्येतीची आस्थेने चौकशी करून आशीर्वाद घेतले. यावेळी ऋषीकेश ढाकणे, सिद्धेश ढाकणे उपस्थित होते. तिसऱ्या पिढीने जनहितासाठी संघर्ष करावा, असा सल्ला ढाकणे यांनी दिला. पवारांच्या या भेटीमुळे ढाकणे कुटुंबीयांचे व पवार घराण्याचे तीन पिढ्यांचे ऋणानुबंध अधोरेखित झाले.
----
२६ ढाकणे
आमदार रोहित पवार यांनी पाथर्डी येथे ज्येष्ठ नेते बबनराव ढाकणे यांची भेट घेतली. यावेळी ऋषीकेश ढाकणे, सिद्धेश ढाकणे उपस्थित होते.