कोपरगाव : राष्ट्रीय महामार्ग व राज्यमार्ग असलेल्या पुणतांबा फाटा चौफुलीवर वर्दळीच्या ठिकाणच्या देशी दारू दुकानाचे शटर तोडून ३ लाख ७५ हजार ४१० रुपये किमतीचे देशी दारूचे सुमारे १७३ बॉक्स अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. दारूवरच डल्ला मारल्याची ही तालुक्यातील दुसरी घटना आहे.
कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा फाटा चौफुलीवर शनिवारी (दि. १३) रात्री दहा वाजेच्यानंतर दुकानाचे शटर तोडून देशी दारूचे बॉक्स लांबविण्यात आले. चोरी झाल्याचे दुकान चालकाच्या रविवारी सकाळी लक्षात आले. दुकानमालक दमयंती विजय शिखरे (वय ६१, रा. सात्रळ, ता. राहुरी) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात रविवारी (दि. १४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे हे करीत आहेत.
दरम्यान, मागील महिन्यात २५ फेब्रुवारीला अशाच पद्धतीने कोपरगाव तालुक्यातील झगडे फाटा परिसरात रात्री ११ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी ट्रकचालकाला मारहाण करून सुमारे २६ लाख रुपये किमतीची दारू भरलेला ट्रक पळविल्याची घटना घडली होती. शनिवारी तर मोठी रहदारी असलेल्या रस्त्यावरील दारूचे दुकान फोडून पावणेचार लाखांच्या दारूची चोरी करण्यात आली आहे. त्यामुळे चोऱ्या रोखण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.