तिसगाव : मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे ग्रहण लागलेल्या तिसगाव-मिरी रस्ता दुरुस्तीचे काम दर्जाहीन होत आहे. तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष करून खड्डे भरले जात आहेत. गुणवत्ताच नसल्याने व डांबराच्या कमी वापराने खडी उखडते. खडीवरून घसरून दुचाकीधारक जखमी होण्याच्या घटना दररोजच घडत आहेत. रस्ता दुरुस्तीचे काम करणाऱ्या ठेकेदारांसह अधिकाऱ्यांवरही सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा. तरच रस्ते दुरुस्तीची कामे गुणवत्तापूर्ण होतील, अशी लेखी तक्रार जिल्हा परिषद सदस्या संध्या आठरे, मिरीचे माजी सरपंच संतोष शिंदे, खांडगावचे माजी सरपंच सुरेश चव्हाण यांनी प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांच्याकडे केली आहे.
सेवा संस्थेचे अध्यक्ष बंडोपंत पाठक, पुरुषोत्तम मिल्कचे अध्यक्ष पुरुषोत्तम आठरे, रामनाथ शिरसाठ, बापू गोरे, संजय नवल, संजय शिंदे, नवनाथ म्हस्के, प्रमोद जऱ्हाड, आदी उपस्थित होते. प्रांताधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडेही तक्रार नोंदविली. आठ दिवसांत रस्ते दुरुस्तीचे काम गुणवत्तापूर्ण न केल्यास तिसगाव येथील वृद्धेश्वर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
----
खराब रस्त्यांमुळे मंत्री येतात चिचोंडीमार्गे..
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे राहुरीहून तिसगावला येताना मिरी मार्गे न येता चिचोंडी मार्गे येतात. खराब रस्त्यांमुळे तेही मार्ग बदलतात, असा खुलासा प्रांताधिकारी कार्यालयात चर्चा करताना एका कार्यकर्त्याने केला. त्यावर चांगलाच हशा झाला.