अहमदनगर : जिल्हा निवडणूक शाखेतर्फे सुरू करण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रमाकडे मतदारांनी पाठ फिरवली आहे. वीस दिवसांत अवघ्या ७ हजार ७३० जणांनीच नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे हे सर्व नवमतदार आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी नाव नसल्याच्या तक्रारी करणाऱ्यांची संख्या मोठी होती. त्यांनी या नावनोंदणी मोहिमेकडे कानाडोळा केला आहे, हे विशेष.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवमतदारांची नावनोंदणी केली जात आहे. याच बरोबर नाव वगळणी, स्थलांतरीत, नावातील त्रुटींसंदर्भात अर्ज भरून घेतले जात आहेत. दि. ९ ते ३० जूनदरम्यान ही मोहीम राबविण्यात येत आहे. २८ व २९ जून रोजी प्रत्येक मतदान केंद्रांवर बीएलओ उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यात ३ हजार ५३७ मतदान केंद्र आहेत. तेथे आज सकाळपासून नावनोंदणी केली जात आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.दि. १ जानेवारी २०१४ रोजी ज्या तरूणांना १८ वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यांची नावनोंदणी केली जात आहे. यादीत नाव नाही, निवडणूक ओळखपत्र आहे, परंतु मतदारयादीत नाव नाही, त्यांना या मोहिमेत नावनोंदणी करता येईल. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या उपस्थित ही नोंदणी सुरू आहे.मतदारांच्या सोयीसाठी १८००२३३३०३३ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. (प्रतिनिधी)अर्जांचे प्रकारमोहिमेत ७ हजार ७३० नवमतदारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. नमुना ६ अ अर्जात नाव समाविष्ट करणे, नमुना ७ नाव वगळणे, नमुना ८ वय, लिंग, नाव दुरूस्ती करणे, ८ अ विधानसभा मतदारसंघात स्थलांतराबाबत आहे. वर्षभरात ही दुसरी मोहीम आहे. कॉलेजमध्ये शिबिरांचे आयोजन केले. बहुतांशी विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. जिल्ह्यात स्त्री-पुरूष लिंग गुणोत्तर १ हजार पुरूषांमागे ९३९ आहे. मतदारयादीत हे प्रमाण ८९८ आहे. जिल्ह्यात ९ हजार बचत गट आहेत. त्यातील महिलांची नोंदणी केली जात आहे. जिल्ह्यात १२ हजार ७३८ टपाली मतदार आहेत. त्यांना यापुढे सेवेच्या ठिकाणी मतदारनोंदणी करता येईल. जिल्ह्यात पुनर्रिक्षणात १ लाख ४६ हजार मतदारांची दुबार नावे वगळली आहेत.-सुनील माळी,उपजिल्हा निवडणूक अधिकारी
विशेष मोहिमेकडे मतदारांची पाठ !
By admin | Updated: June 29, 2014 00:27 IST