अहमदनगर : राज्यातील शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून दोन-दोन महिने विलंबाने पगार होत आहेत. त्यामुळे राज्यातील शिक्षकांचे वेतन शालार्थऐवजी सीएमपी प्रणालीद्वारे होण्याबाबतचे पत्र मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांना शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी दिले आहे, अशी माहिती शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनील गाडगे यांनी दिली.
राज्याने २०१३ पासून शिक्षकांचे वेतन १ तारखेलाच व्हावे म्हणून शालार्थ प्रणालीद्वारे वेतन देयके जमा करण्यास सुरुवात केली. शासनाच्या धोरणानुसार वेतन देयके ही धनादेश विरहित करावयाची असल्याने स्टेट बँक ऑफ इंडियाशी करार करून जिल्हा कोषागारातून प्रत्यक्ष शिक्षकांच्या खात्यावर वेतन जमा होण्यासाठी सीएमपी प्रणालीचा वापर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. या प्रणालीद्वारे अदा होणारी रक्कम प्रत्यक्ष शिक्षकांच्या खात्यावर जमा होणार होती. त्यामुळे शिक्षकांचे वेतन हे १ तारखेलाच जमा होऊ शकले असते. परंतु शालार्थ प्रणाली अपडेट न केल्यामुळे तिचा वापर केवळ बजेट मागणीसाठीच होत आहे व सीएमपी प्रणाली राज्यात कुठेही कार्यान्वित नसल्यामुळे बजेट देऊनही वेतनास विलंब होत आहे. तरी शालार्थमधून सीएमपी प्रणालीचा वापर करण्याच्या सूचना त्वरित देण्यात याव्यात, असे पत्र शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी दिल्याचे शिक्षक नेते सुनील गाडगे, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, उर्दू विभागाचे जिल्हाध्यक्ष मोहमंद समी शेख, योगेश हराळे, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरू, जिल्हा माध्यमिकचे सचिव विजय कराळे, कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, उच्च माध्यमिकचे जिल्हा सचिव महेश पाडेकर, कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, संभाजी पवार, हनुमंत रायकर, सुदाम दिघे, संतोष देशमुख, किसन सोनवणे, संजय तमनर, संभाजी चौधरी, नवनाथ घोरपडे, कैलास जाधव, गोरखनाथ गव्हाणे, सोपानराव कळमकर, संजय भुसारी, शंकर भिवसने, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, महिला सचिव विभावरी रोकडे, कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर, शकुंतला वाळुंज, छाया लष्करे, जया गागरे, अनघा सासवडकर, रेवन घंगाळे, जॉन सोनवणे आदींनी सांगितले.