अहमदनगर : राज्यातील शाळा मंगळवारपासून सुरू झाल्या आहेत. मात्र शिक्षकांच्या उपस्थितीबाबत वेगवेगळे आदेश असल्याने गोंधळ उडाला आहे. शिक्षण संचालकांनी ५० टक्के उपस्थिती सांगितली आहेे, तर स्थानिक अधिकारी शिक्षकांना तोंडी आदेश देत १०० टक्के उपस्थित राहण्यास सांगत आहेत. त्यामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
१५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून, यंदा कोरोनामुळे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वर्ग भरले नाहीत. शाळा बंद असल्या तरी शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत शिक्षकांनी शाळेत येऊन ॲानलाइन अभ्यासक्रम द्यायचा आहे. आता शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहण्याबाबत काहीसा संभ्रम आहे. शिक्षण संचालकांनी ५० टक्के शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहून अध्ययन करावे, असे आदेशात म्हटले आहे. दुसरीकडे दहावी, बारावीच्या शिक्षकांना मात्र १०० टक्के उपस्थिती अनिवार्य केली आहे. त्यामुळे शिक्षकही संभ्रमात आहेत.
-----------------
जिल्ह्यातील शाळा
जि.प. शाळा - ३५७३
माध्यमिक शाळा - १८०३
जि. प. शिक्षक - ११,५२८
माध्यमिक शिक्षक - २१,४२६
-----------
संचालकांचे पत्र काय?
पहिली ते नववी आणि अकरावीच्या वर्गाचे सर्व शाळा महाविद्यालयांत ५० टक्के शिक्षक उपस्थिती अनिवार्य राहील. दहावी व बारावीच्या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांची उपस्थिती १०० टक्के, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थिती १०० टक्के अनिवार्य राहील. सर्व शाळांचे मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य यांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य आहे.
-----------
जि. प. चे पत्र काय?
शिक्षकांची उपस्थिती किती असेल याबाबत जिल्हा परिषदेकडून वेगळे पत्र शिक्षकांसाठी काढण्यात आलेले नाही. काही शिक्षकांना अधिकाऱ्यांनी तोंडी आदेश देऊन १०० टक्के उपस्थितीबाबत कळवले आहे. मात्र तसा लेखी आदेश काढण्यात आलेला नाही.
-----------
प्राथमिक शिक्षकांच्या उपस्थितीबाबत शिक्षण संचालकांचे ५० टक्के उपस्थितीचे पत्र आहे. त्याप्रमाणे शिक्षकांना सूचना दिल्या असून, पहिल्या दिवसापासूनच शिक्षकांनी ॲानलाइन अभ्यासक्रम देण्याचे काम सुरू केले आहे. अधिकाऱ्यांमार्फत विविध शाळांना भेटी देऊन पाहणीही करण्यात येत आहे.
- शिवाजी शिंदे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक
-----------
शिक्षकांची कसरत
शिक्षकांनी शासनाने सांगितल्याप्रमाणे वेळोवेळी चोख कामगिरी बजावली आहे. कोविड काळात विविध सर्वेक्षण तसेच कोविड सेंटरवरही शिक्षकांनी कामे केली आहेत. आताही जवळपास सर्वच शिक्षक शाळेत उपस्थित राहतात. ग्रामस्थांंशी, पालकांशी चर्चा करून हिवरे बाजारप्रमाणे शाळा सुरू करता येऊ शकतात. शिक्षक त्यासाठी तयार आहेत.
- सदानंद डोंगरे, शिक्षक, जि. प. शाळा, पिंपळगाव माथा, ता. संगमनेर
-------------
शाळेच्या पहिल्या दिवसापासून शिक्षक शाळेत उपस्थित राहून ॲानलाइन अध्ययनाचे काम करत आहेत. गेल्या काही दिवसांत शिक्षकांनी शासनाच्या सूचनेप्रमाणे कोविड ड्यूटी, तसेच इतर काम केले. आता शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाकडे सर्वच शिक्षक लक्ष देत आहेत.
- राजू बनसोडे, शिक्षक, जि. प. शाळा, वाकडी, जि. राहाता