अहमदनगर:महापालिकेची पाणीपट्टी व मालमत्ता कर आॅनलाईन भरण्याच्या सेवेचा प्रारंभ महापौर संग्राम जगताप यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला. शहरातील ९५ हजार मालमत्ताधारकांना त्याचा लाभ होणार असल्याची माहिती आयुक्त विजय कुलकर्णी यांनी दिली. मालमत्ताधारकांना महापालिका घरपोहच बिलं पोहच करायची. त्यानंतर मालमत्ताधारकांना प्रभाग कार्यालयात जावून पैसे भरावे लागत होते. ही पध्दत आता आॅनलाईन झाल्याने मालमत्ताधारकांचा वेळ वाचणार आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावर आॅनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून एटीएम कार्डाद्वारेही कर भरता येईल. या सेवेमुळे वेळेत कर भरणा करणे शक्य होणार असून दंडापासून मालमत्ताधारकांची मुक्तता होईल असा आशावाद महापौर जगताप यांनी व्यक्त केला. आयुक्त कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त भालचंद्र बेहेरे, तत्कालीन उपायुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, संगणक विभागाचे अंबादास साळी, दिनेश गांधी यांनी प्रणाली तयार करून कार्यान्वित केली. उपमहापौर सुवर्णा कोतकर, सभापती नसीम शेख, नगरसेवक अजिंक्य बोरकर, कैलास गिरवले, मनेष साठे, निखील वारे यांच्यासह मुख्यलेखाधिकारी हितेश विसपुते, अशोक साबळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कर भरणा आता आॅनलाईन
By admin | Updated: August 19, 2014 23:31 IST