अहमदनगर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या बिलांमध्ये जादाचे पैसे परत करण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून प्रश्न मार्गी लावतो, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिले.
नगर शहरातील खासगी रुग्णालयांनी कोरोनाच्या रुग्णांची वाढीव बिले परत करावीत, यासाठी मनसेने आंदोलने केली होती. तरीही रुग्णांना पैसे परत मिळाले नाहीत. या पार्श्वभूमीवर शरद पवार हे सुरभी हॉस्पिटलच्या उदघाटनाला येणार असल्याने पवार यांना फलक दाखविण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मनसेच्या शिष्टमंडळासमवेत शनिवारी चर्चा केली. यावेळी सुरभीचे संचालक राकेश गांधी यांनी आठ लाख रुपये भरल्याची पावती जिल्हाधिकाऱ्यांना दाखवली. तसेच शरद पवार यांची भेट घडवून देण्याचेही सांगितले होते. त्यानुसार पोलीस प्रशासनाने मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, नितीन भुतारे यांना आमदार संग्राम जगताप यांच्या निवासस्थानी चर्चेसाठी बोलविले होते. पवार यांनी मनसेचे निवेदन स्वीकारले. वाढीव बिलांची रक्कम रुग्णांना परत मिळवून द्या, अशी मागणी यावेळी डफळ यांनी पवार यांच्याकडे केली. त्यावर पवार म्हणाले, गोरगरीब रुग्णांना वाढीव बिले आकारली असतील तर ती परत देण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करतो. तुमचा प्रश्न मार्गी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान महापालिका प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिलेल्या माहितीनुसार १५ खासगी हॉस्पिटलने १ कोटी १३ लाख रुपयांची जादा आकारणी केल्याचे सांगण्यात आले.
---
फोटो- २४ मनसे
मनसेचे सचिन डफळ, नितीन भुतारे यांनी रविवारी आमदार संग्राम जगताप यांच्या निवासस्थानी शरद पवार यांना निवेदन देऊन चर्चा केली.