मिलिंदकुमार साळवे, श्रीरामपूरदिल्लीतून डिजिटल इंडियाचा नारा देण्यापूर्वीच महाराष्ट्रात सुरू झालेल्या आॅनलाईन सातबाराची गाडी ५ वर्षातही सुरळीत धावली नाही. महसूल खात्याचा कारभार आॅनलाईन संगणकीकृत झाला असला तरी शेकडो संगणकांवर दररोज काम करणाऱ्या महसूल खात्यात एकही पूर्णवेळ संगणक अभियंता तथा समन्वयक नसल्याने या पदांची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान, संगणकीकृत सातबाराला सर्व्हरची साडेसाती लागल्याने गेल्या आॅक्टोबरपासून संगणकीकृत सातबाराचे काम जवळपास ढेपाळले आहे. संगणकीकृत सातबाराबाबत येणाऱ्या अडचणींकडे वारंवार लक्ष वेधूनही सरकारकडून त्याची दखल घेऊन उपाययोजना न झाल्याने अखेर गुरूवारी श्रीरामपूर तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या तलाठ्यांनी आपल्याकडील डी.एस.ई. (डिजिटल सिग्नेचर्स) तहसील कार्यालयात जमा करून सरकारच्या निषेधाचे पुढचे पाऊल टाकले. संगणकीकृत सातबाऱ्यासाठी सुरुवातीस एम.ई.एस. प्रणाली वापरण्यात आली. १५ आॅक्टोबर २०१५ पासून एनआरएलएमपी संगणक प्रणालीचा वापर सुरू आहे. या प्रणालीद्वारे आॅनलाईन नोंदीबाबत तलाठी व मंडळाधिकाऱ्यांना प्रशिक्षणच मिळाले नाही. प्रशिक्षणाची तत्काळ सोय होऊन या प्रणालीच्या वापराबाबत मार्गदर्शक पुस्तिका मिळावी, सर्व्हर नेहमी दिवसा बंद राहते व रात्री काही कालावधीसाठी सुरू होऊन नंतर पुन्हा बंद होते. त्यामुळे तलाठ्यांना रात्रंदिवस काम करूनही खातेदारांना त्यांचा अचूक सातबारा देत येत नाही. मोठ्या गट क्रमांकातील एका खातेदाराचा सातबारा दुरूस्तीची नोंद पूर्ण होईपर्यंत त्याच गट क्रमांकातील अन्य खातेदारांच्या नोंदी संगणक स्वीकारत नाही. फेरफाराच्या नोंदी घेताना अनेक तास वाया जातात. अशा अनेक समस्यांमुळे त्रस्त झालेल्या राज्यातील तलाठ्यांनी २१ मार्चलाच या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यानंतर तहसीलदारांनी नायब तहसीलदार पाठवून महसूल मंडळांमध्ये जाऊन वस्तुस्थितीचे अवलोकन करून तलाठ्यांना येणाऱ्या अडचणींचे अहवालसुद्धा सादर केले. पण महिनाभरात त्यापुढे कोणतीही सुधारणा न झाल्याने गुरूवारी तलाठ्यांनी डिजिटल सिग्नेचर तहसीलमध्ये जमा करून सोमवारपासून बेमुदत संपावर जाण्याची तयारी केली आहे.संगणकीकृत सातबाराच्या अडचणीनोंदी भरताना वारंवार लॉगआऊट होते. लॉगइन होण्यास वेळ लागतो. नोंद भरताना एरर येऊन पुन्हा लॉगआऊट होते. काही नोंदी भरल्यानंतर पूर्वालोकन योग्य दिसते. नोंद साठविल्यानंतर काही नोंदीचा फेरफार दिसत नाही. नोंद भरताना प्रत्येक टप्प्यावर युजर रिक्वेस्ट एरर येतो. त्यामुळे ही नोंद पूर्ण झाली किंवा नाही, हे समजत नाही. एखादी नोंद डबल दिसते. बोजा, विहीर, बोअर या सर्व नोंदी सामान्य फेरफारमधून भराव्या लागतात. त्या नोंदी भरताना २ ते ३ तास लागतात. असे दिवसभर किंवा रात्रभर बसल्यास फक्त २ किंवा ३ नोंदी होतात. कधी कधी सर्व्हरमुळे त्यासुद्धा भरल्या जात नाहीत. एका गटात एखादी नोंद घेतल्यास त्याच गटातील दुसऱ्या नोंदीसाठी तो गट ब्लॉक होत असल्याने बऱ्याच नोंदी पेंडिग आहेत. नोंदीच्या संख्या वाढून लोकांच्या रोषास सामोरे जावे लागते. वर्ग-२ च्या कोणत्याही नोंदी भरल्या जात नाहीत. आॅनलाईनला ७/१२ पोट हिस्से पडत नसल्याने खंडकरी शेतकऱ्यांचे वाटप झालेल्या क्षेत्राचे नवीन ७/१२ तयार होत नाहीत. मंडळाधिकाऱ्यांना नोंदी मंजूर करताना वारंवार एरर येतो. तलाठ्यांना संगणक प्रशिक्षण नसल्याने सॉफ्टवेअरमध्ये येणाऱ्या अडचणीमुळे कामकाज थांबते. वेळ वाया जातो त्यामुळे जनसामान्यांमध्ये महसूल विभागाची प्रतिमा खालावते. संगणकीकृत ७/१२ आॅनलाईन कामकाज जोपर्यंत सुरळीत व बिनचूक होत नाही. तोपर्यंत तालुका स्तरावर सॉफ्टवेअरची माहिती असणाऱ्या संगणक तज्ज्ञांची नेमणूक करावी.- के. बी. खाडे, तलाठी, श्रीरामपूर
तलाठी जाणार संपावर
By admin | Updated: April 23, 2016 00:30 IST