नेवासा : नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलात नववीत शिकणारा तेजस थोरात याची आत्महत्या नसून यामागे घातपात असावा, असा संशय मयत तेजसच्या वडिलांनी पोलिसांकडे व्यक्त केला. या घटनेची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. तेजस थोरात (रा. आळेफाटा, ता. जुन्नर) यावर्षीच या शैक्षणिक संकुलात भरती झाला होता. वसतिगृहात तो इतर मुलांबरोबर रहात होता. २५ जुलै रोजी सकाळी व्यायामाला न जाता तो वसतीगृहातच थांबला. नऊच्या सुमारास त्याने टॉयने पाईपला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. तशी नेवासा पोेलिसांच्या दप्तरी नोंद झालेली आहे. २७ जुलै रोजी तेजस याचे वडील गजानन थोरात यांनी आळेफाटाचे सरपंच दीपक कुऱ्हाडे व ग्रामस्थांसह नेवासा पोलिसांची भेट घेऊन तेजसच्या मृत्युविषयी संशय व्यक्त केला. टॉयने गळफास घेऊन तेजसने आत्महत्या केल्याचे वाटत नाही. त्याच्या मृत्युमागे घातपाताचा संशय येत आहे. या घटनेने मी अत्यंत दु:खी झालेलो असून तक्रार अर्ज देण्यास विलंब झाला. त्यामुळे मला क्षमा करावी, असे गजानन थोरात यांनी निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन मुलगा व मला न्याय द्यावा तसेच या घटनेमागे जे दोषी असतील त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही थोरात यांनी या निवेदनाव्दारे केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
मुलाची गळफास घेऊन आत्महत्या नसून घातपात
By admin | Updated: July 28, 2014 00:50 IST