राहुरी : पिंप्री अवघड येथील रिक्षा चालक सुनील अण्णासाहेब सरोदे (वय २५) याने गुरूवारी पहाटेच्या सुमारास रिक्षाच्या हुकला दोर बांधून गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. दुसरीकडे सरोदे याने आत्महत्या केली नसून खून झाल्याचीही चर्चा आहे.गुरूवारी सुनील सरोदे याने घराबाहेरच रिक्षा लावली होती. पहाटेच्या सुमारास त्याच रिक्षात वरच्या हुकाला दोरी बांधून लटकत असलेला मृतदेह शेजारच्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी त्वरित सुनीलच्या घरच्यांना याची माहिती दिली. कुटुंबीयांनी त्वरित सुनीलला राहुरी ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. काही वेळाने पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, सुनीलच्या खिशात पोलिसांना एक चिठ्ठी सापडली असून त्यात चौघाजणांची नावे आहेत. वारंवार मानसिक त्रास दिल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत म्हटले आहे. सागर पवार, सुनील कांबळे, रामदास भरवाड, नजीम शेख या चौघांची नावे चिठ्ठीत नमूद करण्यात आली आहेत. दरम्यान, ही आत्महत्या नसून सुनीलचा खून झाल्याची चर्चाही परिसरात होती. त्यामुळे पोलीस घातपाताच्या दृष्टीनेही तपास करत आहेत. सध्या याप्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)मयताच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून त्यामध्ये चौघांची नावे आहेत. त्यानुसार त्याचौघांची चौकशी सुरू आहे़ सध्या तरी हा आत्महत्येचा प्रकार दिसत आहे. परंतु पोलीस दोन्ही बाजूने तपास करत आहेत.- बालाजी शेंगेपल्लू ,पोलीस उपनिरीक्षक, राहुरी
रिक्षाचालकाची रिक्षातच आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2016 00:29 IST