श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलू शिवारातील दौंड-मनमाड लोहमार्गावरील निमगाव ते गणेशा रस्त्यावरील रेल्वे गेट क्रमांक तीन भुयारी मार्गाचे गटार व डांबरीकरणाचे काम रखडले आहे. त्यामुळे हा भुयारी मार्ग जलमय बनला आहे. येथे आठ ते दहा फूट पाणी साठले आहे. त्यामुळे हा मार्ग बंद झाला आहे.
यासंदर्भात श्रीगोंदा कारखाना माजी संचालक पोपटराव कोळसे, सरपंच दीपाली गणेश भोसले, ग्रामपंचायत सदस्य नीलेश बारगळ, बाळासाहेब साळुंखे, सागर परदेशी, माजी ग्रामपंचायत सदस्य कुलदीप जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेल उपाध्यक्ष गणेश जाधव यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांना निवेदन दिले.
निमगाव खलू ते गणेशा या रस्त्यावर रेल्वे क्रॉसिंगसाठी गेट होते. रेल्वे मंत्रालयाने रेल्वे गेट बंद करण्यासाठी भुयारी मार्गाचे धोरण घेतले. निमगाव खलू शिवारात रेल्वे गेट क्रमांक तीनवर भुयारी मार्ग काढण्यात आली. मात्र येथे भुयारी गटार न केल्याने भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचून राहत आहे. त्यामुळे सहा महिने हा रस्ता बंद होतो. यामुळे या भागातील एक हजार नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शाळकरी मुलांना पाच कि.मी. दूर अंतरावरून शाळेत जावे लागते. दूधवाले, फेरीवाले वैतागले आहेत.
----
याबाबत खासदार डॉ. सुजय विखे यांना निवेदन दिले आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाने तत्काळ दखल न घेतल्यास रेल रोको आंदोलन करणार आहोत.
- दीपाली गणेश भोसले,
सरपंच, निमगाव खलू
----
१८ निमगाव खलू
निमगाव खलू येथील गेट क्रमांक तीनवर रेल्वेमार्गावरील भुयारी मार्गात साचलेले पाणी.