आंबित, पाचनई, कुमशेत, शिरपुंजे, धामनवन या आदिवासी खेड्यातील, तसेच वाड्या वस्तीवरील विद्यार्थी आपल्या गावात मोबाइल नेटवर्क नसल्याने उन्हाळ्यात रानावनात, डोंगरदऱ्यांच्या पायवाटा तुडवत जिथे मोबाइलला रेंज मिळेल, त्या ठिकाणी ऑनलाइन शिक्षण घेत होते; मात्र पावसाळा सुरू झाला आणि डोंगररांगा ओल्याचिंब झाल्या. ओढे नाले वाहू लागले. डोंगरावर, टेकडीवर जाणाऱ्या वाटाही बंद झाल्या. गावात मोबाइलला रेंज मिळत नसल्याने हे शेकडो विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहू लागले आहेत.
................
सुरुवातीला ८० विद्यार्थ्यांपैकी किमान ७५ विद्यार्थी ऑनलाइन क्लासला उपस्थित असायचे; मात्र पाऊस सुरू झाल्यापासून ऑनलाइन क्लाससाठी पंचवीस ते तीसच विद्यार्थी उपस्थित राहत आहेत. अनुपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांशी संपर्कही साधता येत नाही.
-अमोल तळेकर, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख, पाटणकर विद्यालय, राजूर.
..........................
आमच्या परिसरातील गावात रेंज नाही. पाऊस नव्हता तेव्हा आम्ही परिसरातील विद्यार्थी समूहाने डोंगरावर जाऊन ऑनलाइन अभ्यास करत होतो; मात्र आता मागील पंधरा दिवसांपासून पाऊस पडत आहे. जिकडे तिकडे पाणी आहे, त्यामुळे डोंगरावर जाता येत नाही. घरात नेटवर्क मिळत नाही, त्यामुळे ऑनलाइन अभ्यास करता येत नाही.
-मोनिका बारामते, धामनवन, ता. अकोले, इयत्ता १२ वी.