कोपरगाव : तालुक्यातील वारी येथे झोका खेळताना जुनाट लिंबाचे झाड तुटून अभिजीत पगारे (वय १०) या विद्यार्थ्याच्या अंगावर पडल्याने तो जबर जखमी झाला. त्याच्यावर लोेणीच्या प्रवरा ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी सुट्टी असल्याने गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पाठीमागील मैदानावरील लिंबाच्या झाडाला टायर बांधून काही मुले झोका खेळत होती. इयत्ता चौथीत शिकणारा अभिजीत हा देखील त्यांच्यात होता. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ७-८ मुले टायरला लोंबळकून खेळत होती. तेव्हा आतून पोकळ असलेले झाड अचानक तुटून खाली पडले. या झाडाचा पुढील भाग अभिजीतच्या अंगावर पडून फांदी घुसल्याने मांडीचा बराच भाग फाटून तो गंभीर जखमी झाला. मैदानावर क्रिकेट खेळणाºया मोठ्या मुलांसह सतीश गायकवाड यांनी तातडीने झाड बाजूला करून अभिजीतची सुटका केली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. रावसाहेब जगताप व अशोक बोर्डे यांच्या मदतीने गावातील सरकारी दवाखान्यात प्राथमिक उपचार करून नंतर प्रवरा ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले. त्याच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.