कोतूळ : अकोले तालुक्यातील अतिदुर्गम खेतेवाडी गावात दीड वर्षे आश्रमशाळेचे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवायलाच गेले नाहीत. थेट विद्यार्थ्यांनीच या बाबी निदर्शनास आणून दिल्याने ऑनलाइन, गृहभेट शिक्षणाचा वास्तव चेहरा समोर आला आहे.
अकोले तालुक्यातील खेतेवाडी हे आदिवासी गाव पुणे जिल्ह्याच्या हद्दीवर आहे. अकोले तालुक्यात यायला रस्ता नसल्याने हे लोक पुणे जिल्ह्यात जातात. गावात कोणत्याही प्रकारची मोबाइल रेंज नाही. गावात लाइटही नसते. या दुर्गम गावात जिल्हा परिषदेची चौथीपर्यंतची शाळा आहे. यात ३६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गावातील ६५ विद्यार्थी पुणे जिल्ह्यातील मुथाळणे, अकोलेतील पळसुंदेसह इतर शासकीय आश्रमशाळेत शिक्षण घेतात.
खेतेवाडी गावात मोबाइल नेटवर्क नसल्याने इथे ऑनलाइन शिक्षण बंद आहे. जिल्हा परिषद शाळेचे दोन शिक्षक दिवसाआड येऊन वाडीवस्तीवर मुलांना अभ्यास देतात. मात्र, गावातील विविध शासकीय आश्रमशाळांत शिक्षण घेत असलेल्या ६५ विद्यार्थ्यांना दीड वर्ष कुणीही शिक्षक शिकवायला आलाच नाही. गेल्या महिनाभरापासून शिक्षक येत असल्याचे गावातील विद्यार्थ्यांनी सांगितले.
..........
मी पळसुंदे येथील शासकीय आश्रमशाळेत शिक्षण घेतो. दोन वर्षांपासून शाळा बंद आहे. गावात रेंज नाही, तर गेल्या दीड वर्षात एकही शिक्षक गावात शिकवायला आले नाहीत. गेल्या महिन्यापासून शिक्षक येतात.
- हौशिराम गभाले, विद्यार्थी, शासकीय आश्रमशाळा, पळसुंदे
...............
मी पुणे जिल्ह्यातील मुथाळणे येथील शासकीय आश्रमशाळेत सातवीत शिकतोय. गावात दोन वर्षांत एकदाही शिक्षक आले नाहीत.
-सोपान दाभाडे, विद्यार्थी, शासकीय आश्रमशाळा, मुथाळणे, ता. जुन्नर, जि. पुणे