चंदनापुरी : स्मशानभूमीत संशयास्पद फिरणाऱ्या अज्ञात दोघा तरूणांना संतप्त जमावाने बेदम मारहाण करीत दुचाकी पेटविल्याची घटना संगमनेर तालुक्यातील झोळे येथे घडली. पोलीस दोन तास उशिरा आल्याने त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. त्यात उपनिरीक्षकासह २ पोलिस जखमी झाले. मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास झोळे गावच्या स्मशानभूमीमध्ये रवींद्र बापू खैरनार (वय ३२) व संजय पांडूरंग खैरनार (वय४० दोघे, रा. नॉर्दन ब्रँच, श्रीरामपूर) हे संशयास्पद फिरत असल्याचे काही महिलांनी पाहिल्यावर इतर ग्रामस्थांना कळविले. ग्रामस्थांनी दोघांना गावात आणल्यावर ते चोर असल्याचे सांगण्यात आले. चोर पकडल्याची बातमी सर्वत्र पसरताच झोळे, खांडगाव, हिवरगाव पावसा, चंदनापुरी, यशवंतनगर, रायतेवाडी परिसरातील नागरिकांना मोठा जमाव गावात जमला. संतप्त जमावाने दोघांना बेदम मारहाण केली. मात्र मारहाणीत विपरीत घटना घडू नये म्हणून पोलीस पाटील अण्णासाहेब काळे, उपसरपंच किरण नवले, मधुकर वाळे, जिजाबा एरंडे, राहुल नवले, रंगनाथ खर्डे, सुभाष गुंजाळ आदींनी दोघांना वाचवून मारूती मंदिरात कोंडून ठेवले. तालुका पोलीस निरीक्षक संजय भामरे यांना घटनेची माहिती देवूनही पोलीस दोन तास उशिरा गावात पोहोचले. त्यामुळे तणाव निर्माण होवून बाहेरील संतप्त जमावाने पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. त्यात उपनिरीक्षक श्रीकांत पाटील, सहाय्यक फौजदार पोपट खोसे व कॉन्स्टेबल धुळाजी भिसे जखमी झाले. तसेच वाहनाच्या काचा फुटल्या. जमावाला आवरणे शक्य नसल्याचे पाहून आणखी कुमक मागवण्यात आली. भामरे व शहर पोलीस निरीक्षक श्याम सोमवंशी हे फौजफाट्यासह दाखल झाले. त्यांनी जमावाला शांत करून मंदिरात कोंडलेल्या तरूणांना ताब्यात घेतले. पकडलेले दोघेजण स्मशानभूमीतील राखेतून सोने सापडवित असल्याचा संशय आहे. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर) पोलीस दूरध्वनी बंदतालुका पोलीस ठाण्याचा दूरध्वनी क्रमांक (२२५४३३) गेल्या १५ दिवसांपासून बंद आहे. घटनेची माहिती कळविण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. परंतु संपर्क होऊ शकला नाही. दूरध्वनी चालू असता तर पुढील अनर्थ टळला असता, अशा प्रतिक्रिया परिसरातील ग्रामस्थांनी दिल्या.
जमावाकडून मारहाण;पोलिसांवर दगडफेक
By admin | Updated: August 19, 2014 23:31 IST