अहमदनगर: कैकाडी समाजासाठी बापट आयोगाने केलेल्या शिफारशी त्वरित लागू करण्याच्या मागणीसाठी जिल्हा कैकाडी समाज संघटनेच्या वतीने मंगळवारी केडगाव येथील बाह्यवळण रस्त्यावर रस्ता रोको करण्यात आला़यावेळी रस्त्यावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली.जिल्हा कैकाडी समाज संघटनेचे अध्यक्ष डी़ आर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको करण्यात आला़ यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते़ आंदोलनात किशोर जाधव, विनोद गायकवाड, पुंडलिक जाधव, हौशिराम गायकवाड, सुरेश जाधव, रंगनाथ जाधव, नारायण जाधव, दीपक गायकवाड, शंकर जाधव आदी सहभागी झाले होते़कैकाडी समाज भटका व मागास समाज आहे़या समाजाला शासनाच्या कोणत्याही सवलती मिळत नाहीत़ शासनाने या समाजावर क्षेत्रीय बंधने घातली आहेत़ कैकाडी समाज एससी, व्हीजेएनटी-४ अशा दोन वर्गवारीमध्ये आहे़विदर्भात एससी ह्या वर्गवारीतून असून, उर्वरित महाराष्ट्रात हा समाज एससीमध्ये समाविष्ट करावा,अशी शिफारस बापट आयोगाने केलेली आहे़ यामुळे एकाच समाजातील एक व्यक्तीला एससी म्हणून आरक्षण मिळते़ तर एकाला व्हीजे-४ नुसार आरक्षण मिळते़ही बाब कैकाडी समाजावर अन्यायकारक आहे़ ही अन्यायकारक विभागणी बंद करून कैकाडी समाजावर असलेले क्षेत्रिय बंधन त्वरित उठविण्याची समाजाची मागणी आहे़ त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे़ शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते़ पुणे महामार्गापासून काही अंतरावर बाह्यवळण रस्त्यावर हे आंदोलन करण्यात आले़ हातात फलक घेऊन मोठ्या प्रमाणात समाजबांधव उपस्थित होते़यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली़ रस्त्यावर ठाण मांडून नागरिकांनी शासनाच्या विषयीच्या भूमिकेचा तीव्र निषेध केला़ मागणी मान्य न झाल्यास मोठे आंदोलन हाती घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले़
कैकाडी समाजाचा रस्ता रोको
By admin | Updated: August 12, 2014 23:19 IST