अहमदनगर : लष्कर भरतीमध्ये लेखी परीक्षेत पास करून देणे आणि वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल अनुकूल करून देणाऱ्या दलालांच्या टोळीचा सतर्क उमेदवारांमुळे पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी तीन दलालांना अटक केली असून त्यांच्यावर संगनमताने फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर लष्कर भरती प्रक्रिया सुरू होती. या दरम्यान काही दलाल सिद्धीबागेत तळ ठोकून होते. बनावट कागदपत्र तयार करून देण्याचा धंदाच त्यांनी मांडला होता. त्यांच्या या बनवेगिरीच्या जाळ््यात दहा ते बारा उमेद्वार फसले. लेखी परीक्षेत पास करून देणे आणि वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल अनुकूल करून देण्याचा धंदाच त्यांनी मांडला होता. लष्कर भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेत पास करून देण्याचे आमिष दाखवून त्यांनी अनेकांना गंडा घातला. या प्रकरणातील फिर्यादी बाळासाहेब तानाजी गोरे (रा. मातोळा, ता. औसा, जि. लातूर) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर दलालांचे पितळ उघडे पडले. गोरे यांच्यासह दहा ते बारा जणांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणातील आरोपी अमोल अप्पासाहेब औटी (रा. भूषणनगर, केडगाव), संदीप केरू गर्जे (रा. लाकडवाडी, ता. पाथर्डी) आणि आबासाहेब सगट (रा. बाभुळगाव, जि. लातूर) यांनी संगमताने परीक्षेत पास करून देण्याचे आमिष दाखवून उमेदवारांची मूळ कागदपत्रे ताब्यात घेतली. ही कागदपत्रे त्यांनी अनेक दिवस स्वत:कडे ठेवली. भरती प्रक्रिया संपल्यानंतर गोरे यांच्यासह उमेदवारांनी मूळ कागदपत्रे मागितल्यानंतर आरोपींनी ३० हजार रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाहीत तर मूळ कागदपत्र दिले जाणार नाही, अशी धमकीही दिली. यावेळी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गोरे यांनी शनिवारी (दि.१२) रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्याद दाखल झाल्यानंतर याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवून दोन तासांमध्येच दोन जणांना शनिवारीच अटक केले. या प्रकरणाचा तपास तोफखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ए. एन. बेहराणी करीत आहेत. (प्रतिनिधी)
लष्कर भरतीमधील दलालांना अटक
By admin | Updated: July 14, 2014 00:56 IST