प्रमोद आहेर, शिर्डी सध्या संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान नरेंद्र मोदी असले तरी त्यांचे ऊर्जास्थान मात्र अध्यात्मात दडलेले आहे़ गेल्या सहा वर्षांपूर्वी साईदरबारी त्यांनी हे गुपित स्वत:च लिखित स्वरूपात उघड केले आहे़ १५ जून २००८ रोजी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी साईदरबारी हजेरी लावली होती़साईबाबांची पाद्यपूजा केल्यानंतर मोदी यांचा संस्थानच्या वतीने संस्थानचे तत्कालीन अध्यक्ष जयंत ससाणे यांनी सार्इंची मूर्ती व गुजराती साईसच्चरित्र देऊन सत्कार केला़ यावेळी विश्वस्त अशोक खांबेकर, डॉ़ एकनाथ गोंदकर,के ़सी़पान्डे,खासदार दिलीप गांधी,दिलीप संकलेचा, बाबुराव पुरोहित, सचिन तांबे, सचिन सोमवंशी, प्रताप ढाकणे आदींची उपस्थिती होती़ दर्शनानंतर मोदी यांनी संस्थानच्या शेरेबुकात गुजराती भाषेत आपला अभिप्राय नोंदवतांना लिहिले की,भारताची ओळख अध्यात्मिक वारशात आहे़ येथे जीवमात्रा मध्ये परमात्म्याचे दर्शन करण्याची परंपरा आहे़येथे जो विभक्त नाही तो भक्त आहे़ अशा उज्ज्वल परंपरेत सेवा आणि सत्व यांचे संस्कार सिंचन एक खूप मोठा ठेवा आहे़ साईनाथांच्या दरबारात येऊन अध्यात्मिक वातावरणात दर्शन, पूजन एक नवी शक्ती प्रदान करते.मोदी यांनी विश्वस्तांकडून संस्थानचे कामकाज समजावून घेतांना अनेक उपयुक्त सूचनाही दिल्या होत्या़ येथे जगभरातून भाविक येत असल्याने येथील निधीचा उपयोग भाविकांना व शहराला सुविधा पुरवण्याकरता व्हायला हवा अशी अपेक्षा व्यक्त करतांनाच येथे विमानतळाची व चांगल्या रस्त्याची आवश्यकता असल्याचेही मोदींनी सांगितले होते़ महाराष्ट्र हे देवस्थानांचे राज्य असल्याने महाराष्ट्राने देवस्थानांच्या विकास व संवर्धनासाठी स्वतंत्र राज्यमंत्री नेमून मंत्रालय स्थापन करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले़यावेळी त्यांना राष्ट्रीय राजकारणात रस आहे का असे विचारले असता,गुजरात ही आपली कर्म व जन्मभूमी आहे़ मुख्यमंत्री पदाच्या माध्यमातून गुजरात देशात सर्वाधिक प्रगतशील राज्य करण्याकरता बाबा आपल्याला शक्ती देवो असे मोदींनी पत्रकारांना सांगितल्याची आठवण अशोक खांबेकर यांनी सांगितली़
मोदींचे ऊर्जास्त्रोत अध्यात्म!
By admin | Updated: May 24, 2014 00:40 IST