अहमदनगर: जिल्ह्यातील विकास कामांसाठी मंजूर निधी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी खर्च करण्याच्या सूचना मंगळवारी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या़ खासदार व आमदारांचे स्वतंत्र खाते तयार करण्याचे त्यांनी यावेळी सांगितले़जिल्हाधिकारी कवडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन भवनात आढावा बैठक झाली़ या बैठकीत कवडे यांनी वरील सूचना दिल्या़ जिल्हा वार्षिक योजनेतून घेण्यात आलेल्या कामांना प्रशासकीय मान्यता घेतलेली असेल आणि उपलब्ध असेल, अशा कामांना तात्काळ कार्यारंभ देण्याची कार्यवाही करावी़ सध्या जी कामे सुरू आहेत, ती आचारसंहितेत सुरू ठेवता येतील़ मात्र या काळात नवीन कामांना मंजुरी देता येणार नाही़ मंजूर झालेला निधी वेळेत खर्च होईल, याची काळजी घ्या, अशा सूचना कवडे यांनी यावेळी दिल्या़खासदारांच्या निधीतील कामे जास्तीत-जास्त दीड वर्षापर्यंत करता येतात़ याविषयी काही विभागाने कार्यवाही केली नसल्याचे यावेळी निदर्शनास आले़ त्यावर कवडे यांनी नाराजी व्यक्त केली़ कवडे म्हणाले, प्रत्येक खासदारांचे स्वतंत्र खाते ठेवणे आवश्यक आहे़ परंतु काही विभागप्रमुखांनी एकच खाते ठेवले असून, प्रत्येक खासदार व आमदारांचे स्वतंत्र खाते ठेवा़ तसेच प्रत्येक खासदारांच्या कामाचा नियमित आढावा घेऊन माहिती ठेवा, असे त्यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
आचारसंहितेपूर्वी निधी खर्च करा
By admin | Updated: August 19, 2014 23:32 IST