जामखेड : तालुक्यातील जवळा येथे कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने ग्रामपंचायत सदस्या आरती देवमाने यांनी जामखेड येथील महावितरणच्या कार्यालयात गुरुवारी ठिय्या आंदोलन केले.
महावितरणचे कनिष्ठ अभियंता यांच्याकडून येत्या ५ दिवसात पूर्ण दाबाने वीज उपलब्ध करून देऊ, असे लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलनकर्त्या देवमाने यांनी आंदोलन मागे घेतले.
जवळा येथील शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नी ५ एप्रिल रोजी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता योगेश कासलीवाल यांना निवेदन देण्यात आले होते. दोन दिवसात शेती पंपाचा वीज पुरवठा सुरळीत न झाल्याने महावितरणच्या कार्यलयासमोर ८ एप्रिल रोजी ग्रामपंचायत सदस्या आरती देवमाने यांनी सकाळी ११ वाजता महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. जवळा परिसरातील शेतीपंपांना दोन-तीन महिन्यांपासून कमी दाबाने वीज मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. सरपंच प्रशांत शिंदे यांनीही आंदोलनास पाठिंबा दिला. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी पुढाकार घेत महावितरण अधिकारी यांच्या बरोबर चर्चा केली. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी सरपंच प्रशांत शिंदे, मनसेचे तालुकाध्यक्ष प्रदीप टापरे, कुसडगावचे सरपंच बापूसाहेब कार्ले, मनसेचे उपाध्यक्ष सनी सदाफुले, भाजप अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अमजद पठाण, राष्ट्रवादीचे नय्युम शेख, जीवन रोडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अविनाश ढेरे आदी उपस्थित होते.
--
०८ जवळा आंदोलन
जवळा ग्रामपंचायत सदस्या आरती देवमाने यांना लेखी आश्वासन देताना महावितरण अधिकारी, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड.