नेवासा फाटा : येथे ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
राजमुद्रा चौकात मुकिंदपूर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी नेवासा तालुका एकता पत्रकार संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष संदीप गाडेकर यांनी मास्कचे वाटप केले. ठिकठिकाणी मोटारसायकलसह इतरही चारचाकी गाड्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा व भगवे झेंडे लावण्यात आले होते. अनेक ठिकाणी शिवप्रेमींनी रक्तदान शिबिरे, विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले हाेते. शाळा, कॉलेजातील मुले-मुलीही सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. मास्टर सुरेश लव्हाटे यांच्या राजे शिवकालीन मर्दानी आखाड्यातील विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके करून दाखविली. यामध्ये प्रामुख्याने लाठीकाठी, तलवार, दांडपट्टा, भाला, पाशचक्र आदी इतिहासकालीन शस्त्रांची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.
प्रसिद्ध चित्रकार भरतकुमार उदावंत आणि त्यांचे पुत्र सत्यजित उदावंत यांनी रेखाटलेल्या शिवचरित्राचे आणि चित्रांचे प्रदर्शन आयोजित केले होते. युवा नेते उदयन गडाख यांनी नेवासा फाटा येथे ठिकठिकाणी शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मोटारसायकल रॅलीचे नेतृत्व केले. यावेळी त्यांच्यासमवेत मुकिंदपूरचे सरपंच सतीश निपुंगे, पंचायत समितीचे उपसभापती किशोर जोजार, शिवसेना शहरप्रमुख नितीन जगताप, किशोर भणगे, निलेश निपुंगे, रावसाहेब घुमरे, गणेश निमसे, प्रताप हांडे, नीरज नांगरे, गणेश झगरे, चंद्रशेखर ठुबे, संजय लिपाणे, निवृत्ती जायगुडे आदी उपस्थित होते.