प्रमोद आहेर, शिर्डीमार्स आॅर्बिटर मिशन (एमओएम)अर्थात मंगळयानाने नुकताच मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला़ या घटनेने जगात देशाची मान उंचावली असतानाच शिर्डीचा सुपुत्र असलेल्या एका तरुण शास्त्रज्ञाच्या या ऐतिहासिक मोहिमेतील सहभागाने शिर्डीसह तालुक्याचा ऊर अभिमानाने भरुन आला़ अमोल नानासाहेब गाढवे असे या सव्वीस वर्षीय तरुणाचे नाव आहे़ येथून जवळच असलेल्या एकरुखे या खेड्यात शेतकरी कुटुंबात जन्मलेला अमोल सध्या केरळमधील विक्रम साराभाई स्पेस सेंटर, त्रिवेंद्रम (इस्त्रो) येथे सायन्टीस्ट / इंजिनिअर ग्रेड-३ या पदावर काम करत आहे़ येथे विशेषत: प्रक्षेपण यानाच्या विकासावर आणि उड्डाण प्रक्रियेवर काम चालते़ यात अमोल यानाच्या प्रक्षेपणापूर्वी सर्व तांत्रिकबाबी तपासणी करणाऱ्या टिम मध्ये काम करतो़ श्रीहरीकोटा येथून गेल्या ५ नोव्हेंबरला प्रक्षेपित केलेल्या पीएसएलव्ही-सी-२५ या मंगळ मोहिमेवरील यानासाठी त्याच्या पथकाने काम केले आहे़ यानाच्या उड्डाणानंतर या पथकाचा सहभाग संपतो़त्यानंतर या यानाचे नियंत्रण बंगलोर येथून चालते़ परवा हे यान मंगळाच्या कक्षेत पोहोचत असताना सगळेजण श्वास रोखून या घटनेचे थेट प्रक्षेपण बघत होते़ मोहीम यशस्वी होताच जल्लोष करण्यात आला़अमोल गाढवे हा सामान्य कुटुंबातील आहे़ साईबाबा संस्थानचे विद्युत अभियंता विजय रोहमारे यांनी आपला मुलगा अनुपचा जीवलग मित्र असलेल्या अमोलचा मुलाप्रमाणे सांभाळ करुन त्याला मदत केली़ पुण्यात फर्ग्युसन कॉलेजलाही दोघांनी एकत्रितच प्रवेश घेतला़ तेथेच त्याचा इस्त्रोचा पाया रचला गेला़ जेव्हा दहावीला अमोल राहाता येथील सेंट जॉन शाळेत प्रथम आला तेव्हात्याच्या पुढील शिक्षणासाठी अनेक जणांनी मदतीचा हात पुढे केला होता. समाजाने बळ दिलेल्या याच अमोलचे हात आज अवकाशाला गवसणी घालण्यासाठी सक्षम झाले आहेत़ अमोल गाढवे याने ‘लोकमत’शी दूरध्वनीवरून बोलताना सांगितले की,‘मंगळयानाच्या यशाबद्दल आम्ही सर्व खूप आनंदी आहोत. ही मोहीम म्हणजे मैलाचा दगड असून पुढील पिढीसाठी हे प्रेरणादायी ठरेल़ आमच्या सांघिक प्रयत्नाचे हे यश आहे़ इस्त्रोच्या संस्थापकांनी जी दूरदृष्टी ठेवून या यशाची मुहूर्तमेढ रोवली, त्यांना मी अभिवादन करतो, त्यांच्यामुळेच जगभरात भारताची मान उंचावली, इस्त्रोचा घटक असल्याबद्दल मला अभिमान वाटतो़’
मंगळयान मोहिमेत शिर्डीच्या सुपुत्राचा सहभाग
By admin | Updated: September 27, 2014 00:15 IST