अहमदनगर : औरंगाबाद येथील सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेत (एसपीआय) नगर जिल्ह्यातील ७ जणांची निवड झाली आहे. या परीक्षेत नगरच्या श्रेयस प्रफुल्ल धसे आणि चिराग दिनेश शर्मा हे दोन विद्यार्थी अव्वल ठरले आहेत. एनडीएमध्ये निवड होण्यापूर्वीचे सर्व प्रशिक्षण आणि बारावीचे केंद्रीय बोर्डाच्या अभ्यासक्रमाचे शिक्षण या संस्थेत दिले जाते.महाराष्ट्रात औरंगाबाद येथे सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था ही एकमेव आहे. या संस्थेत प्रवेश मिळविण्यासाठी राज्यात चार केंद्रावर २७ एप्रिल रोजी शंभर गुणांची परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षा झाल्यानंतर तीन तासांनी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी ही ८० गुणांची परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर लष्करातील उच्च पदावरील अधिकाऱ्यांनी घेतलेल्या मुलाखतीद्वारे राज्यातून फक्त ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. नगरचा चिराग दिनेश शर्मा हा देशात केंद्रात अठरावा, तर श्रेयस प्रफुल्ल धसे हा १९ वा आला आहे. या दोघांशिवाय तेजस प्रदीप आकडकर, कृष्णा वरपे, सनी उंडे, सौरभ औटी, अनिरुद्ध भिंताडे यांचीही या संस्थेत निवड झाली आहे. राज्यातून नगर जिल्ह्यातीलच सात जणांची निवड झाल्याने नगरच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत दबदबा निर्माण केला आहे. नगरचा श्रेयस धसे हा किल्ल्याजवळील केंद्रीय विद्यालय क्रमांक-१ चा विद्यार्थी आहे. दहावी परीक्षेतही त्याने ९० टक्के गुण मिळविले आहेत.एनडीएला जाण्यासाठीचे सर्व प्रशिक्षण या संस्थेत मिळणार आहे. दोन वर्षांचा हा अभ्यासक्रम आहे. यासह अकरावी, बारावीचे शिक्षण दिले जाणार आहे. सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड आणि यूपीएससी या परीक्षांचीही या केंद्रात तयारी केली जाते.आर्मीमध्ये जाऊन देशाची सेवा करण्याची संधी मिळणे म्हणजे अभिमानच वाटतो. एनडीएमध्ये निवड झालेल्या चिन्मय कुलकर्णी याचा आदर्श घेऊन पुढील वाटचाल करण्याचा निर्णय घेतला. एसपीआयमध्ये निवड झालेला नीरज इनामदार याचेही मार्गदर्शन मिळाले.आई-वडिलांचा पाठिंबा यामुळेच हे यश गाठता आले.-श्रेयस धसे, सावेडी
एसपीआयसाठी सात जणांची निवड
By admin | Updated: June 10, 2014 00:12 IST