शिर्डी : एकीकडे सोशल मीडियामुळे अनेकांची घरे उद्ध्वस्त होताना दिसत आहेत. मात्र, याच सोशल मीडियाने हरवलेल्या बहिणीची भावांशी भेट घडवून आणली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संबंधित महिला दिसली अन् तिच्या भावांनी थेट शिर्डी गाठली. त्यामुळे मध्य प्रदेशात रक्षाबंधनाच्या दिवशीच हरवलेली बहीण तिच्या भावांना साईबाबांच्या शिर्डीत सापडली.
कोरोनामुळे मंदिर बंद असताना साईभक्तांना बाबांची आरती बघायला मिळावी यासाठी शिर्डीतील शिवसैनिक सुनील परदेशी यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमुळे या भावा-बहिणीची भेट झाली. कांता निघलानी ही ६५ वर्षांची वृद्ध महिला मध्य प्रदेशात जुनाडगड येथे आपल्या मुलाकडे राहत होती. मुलगा व सुनेकडून होणाऱ्या मानसिक व शारीरिक त्रासाला त्या कंटाळल्या होत्या. गेल्या महिन्यात रक्षाबंधनाच्या दिवशी कांता निघलानी सकाळी फिरायला बाहेर पडल्या. मात्र, त्या घरी परतल्याच नाही. ऐन रक्षाबंधनच्या दिवशी बहीण हरवल्याने बहिणीच्या भेटीसाठी भाऊ व्याकूळ झाले होते. बहिणीची शोधाशोध करूनही हाती निराशा आल्याने त्यांनी बहीण हरवल्याची तक्रार जुनाडगड पोलीस स्टेशनला दाखल केली होती. त्या कुठे गेल्या याचा काहीही थांगपत्ता लागत नव्हता.
दरम्यान, शिर्डीतील साईमंदिर बंद असल्याने देशभरातील भाविकांना साईंचे दर्शन मिळावे, यासाठी शिर्डीतील शिवसैनिक सुनील परदेशी रोज काही वेळाचे व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर टाकतात. दोन दिवसांपूर्वी असाच एक व्हिडिओ त्यांनी काढला आणि दिल्लीच्या साईभक्तांच्या ग्रुपवर पाठवला. या व्हिडिओत डोळ्यात अश्रू दाटलेल्या अवस्थेत काकड आरतीला उपस्थित असलेल्या कांता निघलानी दिसत होत्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि तो कांता निघलानी यांच्या नातेवाइकांपर्यत पोहोचला. व्हिडिओ पाठविणाऱ्याचा शोध घेत ते सुनील परदेशी यांच्या संपर्कात आले. परदेशी यांना फोन करून त्यांनी सर्व घटना सांगितली. सुनील परदेशी यांनी त्या महिलेचा साई मंदिर परिसरात शोध घेऊन तिला घरी नेले व त्याची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानंतर आजीचे भाऊ सोमनाथ पाहवा स्थानिक पोलिसांच्या मदतीने तातडीने शिर्डीत दाखल झाले. पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांच्या उपस्थितीत या बहिणीला भावांकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी बहीण-भावांसह सगळ्यांचेच डोळे पाणावले. यावेळी सुनील परदेशी, स्वाती परदेशी, राजेंद्र कोहकडे, मध्य प्रदेशातील गुलाबी गँगच्या कमांडर पौर्णिमा शर्मा, पोलीस उपनिरीक्षक अनिता सराटे उपस्थित होत्या.