अहमदनगर : राज्य शासनाने १ आॅगस्ट २०१५ पासून एलबीटी बंद केली. एलबीटी बंद झाली असली तरी २०१४-२०१५ मधील रिटर्न महापालिकेकडे दाखल न करणाऱ्या दोन हजार व्यापाऱ्यांची बॅँक खाती सील करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तशा नोटिसा संबंधित व्यापाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. याशिवाय शहरातील ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असणाऱ्यांची माहितीही महापालिकेने विक्रीकर विभागाकडून मागविली आहे. उपायुक्त अजय चारठाणकर यांनी मंगळवारी दिवसभर एलबीटी विभागाची तपासणी केली. राज्य शासनाने एलबीटी बंद केली असली तरी त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षाचे रिटर्न महापालिकेकडे दाखल करणे गरजेचे होते. तीन हजार व्यापाऱ्यांनी रिटर्न दाखल केले नव्हते. या व्यापाऱ्यांना महापालिकेने नमुना ‘ज’ नुसार नोटीस पाठवून रिटर्न दाखल करण्याचे सांगितले. त्याला केवळ एक हजार व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत रिटर्न दाखल केले. राहिलेल्या तीन हजार व्यापाऱ्यांनी रिटर्न दाखल केले नसल्याची माहिती तपासणीत चारठाणकर यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे या दोन हजार व्यापाऱ्यांना महापालिकेने दंडात्मक कारवाई व बॅँक खाती सील का करण्यात येऊ नये, अशा नोटिसा पाठवून त्यावर खुलासा मागविला आहे. जे व्यापारी खुलासा करणार नाहीत किंवा त्यांचा खुलासा असमाधानकारक असेल, अशा व्यापाऱ्यांची बॅँक खाती सील केली जाणार आहेत. ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यांना एलबीटी कायम आहे. शहरातील केवळ चार व्यापारी एलबीटी भरतात. मात्र, अनेक व्यापाऱ्यांची उलाढाल ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक असून त्यांनी एलबीटी न भरण्यासाठी पळवाट शोधली आहे. त्यामुळे विक्रीकर विभागाकडून ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असणाऱ्यांची माहिती महापालिकेने मागविली आहे. महापालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढीचा उद्देश त्यामागे असल्याचे उपायुक्त चारठाणकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
दोन हजार व्यापाऱ्यांचे बॅँक खाते सील?
By admin | Updated: May 17, 2016 23:57 IST