शाळकरी मुलांना आता आपले शिक्षक, वर्गमित्र, शालेय परिसराची ओढ लागल्याचे दिसत आहे. कोरोनाने शाळा दुरावल्याची खंत या मुलामधून व्यक्त केली जात आहे. कोरोनाचे पुनरागमन झाले व सध्या सुरू असलेल्या माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर परिणाम झाला. पारनेर तालुक्यातील सुपा परिसरातील शाळांमध्ये २० ते २५ टक्के विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्याऐवजी घरीच राहणे पसंत केल्याची माहिती मिळाली.
दोन टप्यात माध्यमिक विद्यालय सुरू करण्यात आले. सुरुवातीला वरचे वर्ग सुरू झाले. नंतरच्या टप्यात पाचवीपासून पुढे विद्यार्थ्यांची शाळा सुरू करण्यात आली. पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थी शिकत असलेल्या शाळाची चालू शैक्षणिक वर्षात घंटा वाजलीच नाही. त्यामुळे जवळपास वर्षभर मुलांना सुटीचा आनंद लुटता आला असला तरी त्यांचे शैक्षणिक नुकसानही झाले आहे.
ऑनलाइन शिक्षणप्रक्रिया राबविण्यात आली, परंतु त्यासाठी लागणाऱ्या सुविधा मात्र उपलब्ध न झाल्याने हळूहळू विद्यार्थी शिक्षणापासून दुरावल्याचे चित्र दिसू लागले आहे. ऑनलाइनसाठी नेटवर्क, अँड्रॉइड फोन, नेटपॅक, घरची आर्थिक परिस्थिती या गोष्टींच्या मर्यादा आल्याने मुले ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहिली.
सुपा, हंगा, वाघुंडे, पळवे, वाळवणे, रुई छत्रपती, बाबुर्डी, रांजणगाव रोड आदी शाळा प्रशासनाने सांगितले. शाळेला उपस्थितीबाबत सक्ती करता येत नाही. शिक्षक, विद्यार्थ्यांसाठी मास्क वापरणे बंधनकारक असून, सॅनिटायझरची सुविधा शालेय प्रशासनाने केली असून, वातावरण निरोगी ठेवण्यात यश आले आहे.
आता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव चाचणी परीक्षा सुरू झाल्या आहेत त्याला बऱ्यापैकी उपस्थिती असली तरी कोविडच्या भीतीच्या सावटाने शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर परिणाम झाला असून, प्राथमिक शाळा सुरू होण्याच्या शक्यता पुन्हा दुरावल्याने आपल्या पाल्याच्या भवितव्याबद्दल पालक चिंतातुर झाले आहेत.
......
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी गृहभेटी सुरू केल्या असून त्याद्वारे शिक्षक त्यांच्याकडून स्वाध्याय पुस्तिका पूर्ण करून घेणे, त्यांच्या शंकांचे निरसन करून त्यांना मार्गदर्शन करताना सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करतात.
- बाळासाहेब बुगे, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती
.................
फोटो सुपा
-----प्राथमिक शाळा सुरू नसल्याने खेळण्यात मनसोक्त रमलेली अशी मुले गावात ठिकठिकाणी पहावयास मिळतात